प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 86व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली होती. अखेर बुधवारी रात्री रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, नितीन गडकरी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, यांसारख्या अनेक दिगज्जांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली !

रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X (ट्विटर) वरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘ श्री रतन टाटा हे एक दूरदर्शी बिझनेस लीडर, दयाळू आणि विलक्षण माणूस होते. भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना त्यांनी स्थिर नेतृत्व दिले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले, ‘असे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला शोक

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शोक व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत तेथेही त्यांच्या भावना मांडल्या.

‘ नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे 150 वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.

मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. ज्येष्ठ उद्योगपती श्री रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

श्री रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्यापलीकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण, आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले. फार पूर्वी टाटा ट्रस्टने कँसर रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत, किंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्राण्यांचे रुग्णालय हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते. रतन टाटा यांच्यासोबत अनेकदा भेटीची संधी मला प्राप्त झाली. मुख्यमंत्री असताना राज्यात व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची निर्मिती आम्ही केली, त्यावेळी बहुतेक बैठकांना ते येत असत. अतिशय सक्रिय राहून त्यांनी राज्य सरकारसोबत काम केले होते. त्याच काळात राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे आयोजन केले, तेव्हाही ते सातत्याने सोबत होते. नागपुरात आम्ही नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची स्थापना केली, तेव्हा सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला. त्यांचे जाणे, ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

भारतीयांच्या मनात प्रेम, आदर, आपुलकीचं स्थान असलेल्या रतन टाटा यांचं निधन ही भारतीय उद्योगजगताची मोठी हानी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

‘ उद्योगपती रतन टाटा हे भारतीय उद्योगक्षेत्राचा विश्वासार्ह,आश्वासक चेहरा होते. टाटा उद्योगसमुहाला आंतरराष्ट्रीय उंची, सन्मान, प्रतिष्ठा, विश्वासार्हता मिळवून देतांना देशाचा गौरव वाढवण्याचं काम त्यांनी केलं. सचोटी, प्रामाणिकपणाने उद्योग क्षेत्रात यश मिळवता येतं हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखवलं. संकटकाळात देशवासियांच्या मदतीला धावून येणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योगसमुह म्हणून टाटा उद्योगसमुहाला देशभक्तीचं प्रतिक बनवण्यात ते यशस्वी ठरले. सर्वसामान्य भारतीयांचं कारचं स्वप्न त्यांनी ‘नॅनो’ कारच्या माध्यमातून पूर्ण केलं. टाटा उद्योगसमुहाचेD संस्थापक नुसेरवानजी, जमशेटजी टाटा यांचा उद्योग, व्यापार, सामाजिक कार्य, देशभक्तीचा वारसा त्यांनी यशस्वीपणे पुढे नेला. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम, आदर, आपुलकीचं स्थान निर्माण करणाऱ्या रतन टाटा साहेबांचं निधन ही भारतीय उद्योगजगताची मोठी हानी आहे. टाटा परिवार आणि रतन टाटा साहेबांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. रतन टाटा साहेबांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,’ असे अजित पवार यांनी नमूद केलं.

नितीन गडकरींनी व्यक्त केले दुःख

देशाचे महान सुपुत्र रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. तीन दशकांहून अधिक काळ त्यांच्याशी घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. अशा महान व्यक्तीचा साधेपणा, त्यांचा उत्स्फूर्तपणा, त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांचाही आदर करणे, हे सर्व गुण मी अगदी जवळून पाहिले आणि अनुभवले. त्यांच्याकडून मला आयुष्यात खूप काही शिकायला मिळाले,अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

विजय वडेट्टीवार यांची श्रद्धांजली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘भारताचे सुपुत्र, पद्म विभूषण रतन टाटा यांच्या निधनाने एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वाने आज जगाचा निरोप घेतला आहे. आपल्या योगदानाने उद्योग, समाजसेवा आणि मानवतेसाठी नवीन आदर्श रतन टाटा यांनी लोकांपुढे ठेवला. देश संकटात असताना अनेक प्रसंगावर त्यांनी देशासाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही.

त्यांचे कार्य , विचार आणि योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून कार्य करतील. त्यांच्या निधनाने आज आपल्या देशाने सर्वात “अमूल्य रत्न” असे व्यक्तिमत्व असलेले एक आदर्श व्यक्ती गमावले आहे.

श्री.रतन टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो! ‘ असे त्यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *