पुण्यातील २६ वर्षीय तरुणी अ‍ॅना सेबेस्टियन या तरुणीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही तरुणी EY या कंपनीत काम करत होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने कंपनीतल्या वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. ज्या आरोपांनंतर आता कंपनीने या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं आहे.

ई. वाय. कंपनीने नेमकं काय म्हटलं आहे?

अ‍ॅना सेबेस्टियन या आमच्या तरुण कर्मचारी महिलेला आम्ही गमावलं याचं आम्हाला अतीव दुःख आहे. जुलै २०२४ मध्ये तिचा मृत्यू झाला. आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत. तसंच तिच्या कुटुंबाविषयी आमच्या संवेदना आहेत. अ‍ॅना १८ मार्च २०२४ या दिवशी आमच्या कंपनीत रुजू झाली होती. ती आमच्या ऑडिट टीमचा भाग होती. ए.आर. बाटलीबोई यांच्या टीममध्ये ती काम करत होती. अवघ्या चार महिन्यांतच पुणे येथील कार्यालयात काम करताना तिचा हृदयविकाराने मृत्यू झाला ही बातमी आमच्यासाठीही क्लेशदायक आहे. कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई देऊन तिच्या कुटुंबाचं दुःख भरुन येणार नाही. आम्ही तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला आहे. त्यांनाही आमच्या भावना काय आहेत ते कळवलं आहे. आम्ही आमच्या कंपनीत काम करणाऱ्या एक लाखांहून अधिक कर्मचारी चांगलं वातावरण कसं मिळेल यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. भारतात आमच्या जेवढ्या शाखा आहेत तेवढ्या शाखांमध्ये कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण असेल, कुणावरही ताण येणार नाही असं वातावरण आहे.” असं म्हणत कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे.

अ‍ॅनाच्या मृत्यूनंतर तिच्या आईने एक पत्र कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमाणी यांना लिहिलं होतं. त्यानंतर आता कंपनीने हे स्पष्टीकरण दिलं आहे. अनिता यांनी म्हटलं आहे की अ‍ॅना खूप चांगल्या पद्धतीने आणि उत्साहाने काम करत होती. मात्र तिच्यावर कामाचा प्रचंड ताण होता त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या आईने केला होता.

अ‍ॅना सेबेस्टियन पेरायिलच्या आईने काय आरोप केले?

“अ‍ॅनाचे कार्यालयातील वरिष्ठ तिला इतकं काम द्यायचे की ती गेल्या काही दिवसांपासून खूप तणावाखाली वावरत होती. तिच्यावर काम पूर्ण करण्यासाठी दबाव टाकला जात होता. काम वेळेत पूर्ण होईल की नाही? या दडपणाखाली असलेल्या माझ्या मुलीने अखेर कंपनीचा ताण सहन न झाल्याने तिचा मृत्यू झाला.” अ‍ॅना सेबेस्टियनची आई अनिता ऑगस्टीन यांनी ई. वाय. इंडिया कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी मेमानी यांना विनंती केली आहे की “माझ्या मुलीला न्याय मिळायला हवा”. तसेच ई. वाय. इंडिया कंपनीच्या धोरणांमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचं ऑगस्टीन यांनी नमूद केलं आहे.