kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दिल्ली हादरली; सीआरपीएफच्या शाळेबाहेर स्फोट! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

दिल्लीचा रोहिणी परिसर आज सकाळी झालेल्या भीषण स्फोटाने हादरला. प्रशांत विहार परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) शाळेजवळ स्फोट झाला, पण स्फोट कसा आणि कशात झाला? हे अद्याप कळू शकलेले नाही. एफएसएल पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. एनआयए टीम, एनएसजी कमांडो आणि दहशतवादविरोधी युनिट घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. बॉम्ब आणि श्वान पथकाने परिसराला वेढा घातला आणि शोध घेतला, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही.

सीआरपीएफ शाळेजवळ हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी एफएसएल पथकाला घटनास्थळी पाचारण केले आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्फोटानंतर आकाशात धुराचे ढग दाटून आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस हजर आहेत. प्राथमिक तपासात अग्निशमन दलाच्या पथकाला घटनास्थळावरून सध्या काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही. एफएसएलचे पथकही याची कसून चौकशी करत आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत विहार पोलीस ठाण्यात आज सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी स्फोटाच्या माहितीबाबत पीसीआर कॉल आला. रोहिणी सेक्टर-१४ रोहिणी येथील सीआरपीएफ शाळेजवळ मोठ्या आवाजात हा स्फोट झाला. एसएचओ पोलिस कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी शाळेच्या भिंतीचे नुकसान झाले आणि तिथे दुर्गंध येत असल्याचे आढळले. तसेच, शेजारच्या दुकानाच्या काचा आणि दुकानाजवळ उभ्या असलेल्या कारचेही नुकसान झाल्याचे आढळून आले. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.