मुंबई विद्यापीठाच्या जहांगीर कावसजी सभागृहात आज झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री डॉ. फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या. राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यांच्यामुळे जपानमधील कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मला मिळाली. ही पदवी मी माझ्या महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो. राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेल, अशा भावना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2035 मध्ये 75 वर्षे पूर्ण करीत असलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचे मानचित्र तयार करत असल्याचे सांगितले.
भारत जपानच्या मैत्री संबंधांचा आढावा घेताना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र विकासाचा रोडमॅप मांडला. कोयासन विद्यापीठ हे कू काई यांनी सुरू केले. त्यांनी बुद्धिझम जपानमध्ये रुजवला. जगातील महत्वाचे केंद्र म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यांनी हा सन्मान दिल्याबद्दल या विद्यापीठाचा मी ऋणी आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
जपानने सातत्याने भारताला आणि महाराष्ट्राला मदत केली. जपान हा आपला अतिशय जवळचा आणि विश्वासू मित्र आहे. त्यामुळेच हा केवळ मैत्रीचा नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्या जोडणारा अध्याय आहे. कोयासन विद्यापीठाने डॉक्टरेट देताना पायाभूत विकास, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समता या गोष्टीचा विचार केल्याचे ते म्हणाले.आपल्या राज्याने पायाभूत क्षेत्र विकासासाठी 2014 साली काम सुरु केले. मुंबईच्या पायाभूत क्षेत्र विकासात जपानचा मोठा वाटा आहे. आपली भुयारी रेल्वे, ट्रान्स हार्बर लिंक, समुद्र सेतू यासह अनेक प्रकल्पासाठी मोठी मदत जपान सरकारने केली आहे. याशिवाय, शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रात मदत जपानने केली आहे. आगामी काळात वर्सोवा ते विरार ही सी लिंक तयार करण्याची चर्चा झाली आहे. पूरनियंत्रण क्षेत्रात जपानची मदत घेऊन काम केले जाणार आहे. आता आपण या क्षेत्रात अशा ठिकाणी आहोत की इतर राज्यांना आपल्या पर्यंत पोहो पोहोचायला खूप वेळ लागेल, असे फडणवीसांनी नमूद केले.
पायाभूत सुविधा ही विकासाची गुरुकिल्ली आहे. आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत क्रमांक एकचे राज्य असल्याचे फडणवीसांनी सांगितले. महाराष्ट्र हे स्टार्ट अप कॅपिटल झाले आहे. कोणतेही राज्य पुढे न्यायचे असेल तर चांगल्या प्रशासनाची गरज असते आणि महाराष्ट्र हे त्यासाठी ओळखले जाते. आपण 2014 ते 2019 मध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम केले. त्यामुळे देशाच्या तुलनेत राज्यातील जमिनीची पाणी पातळी उंचावण्यास मदत झाल्याचे फडणवीसांनी सांगितले. महाराष्ट्र हे असीमित शक्ती असणारे राज्य आहे. नवभारत निर्माणासाठीचा रस्ता महाराष्ट्रातून जातो. सामाजिक समतेचा मोठा इतिहास. डॉ.बाबासाहेबांनी संविधनाद्वारे संधीची समानता दिली. त्यामुळे आपण सर्व समाज घटकांना पुढे कसे नेता येईल, त्यांना शिक्षणाची संधी, शिष्यवृत्ती याद्वारे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. या राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेल, अशा शब्दांत फडणवीसांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.