नाताळचा सण म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणून साजरा केला जातो. असं म्हणतात की या दिवशी येशूचा जन्म झाला होता पण हा उत्सव नेमका कधीपासून सुरु झाला? येशूचा जन्म नेमका कधी झाला याची माहिती कधी शोधण्याचा प्रयत्न केला का? नाताळच्या निमित्ताने आज संपूर्ण गोव्यात सणाचं वातावरण पसरलेलं असताना जाणून घेऊया नाताळ सणामागची नेमकी गोष्ट आहे तरी काय..
‘दिएस नातालिस’ या लॅटिन शब्दावरून नाताळ हा शब्द रूढ झाला. बेथलहम येथे मेरी आणि जोसेफ यांच्या घरी भगवान येशू यांचा जन्म झाला होता. सेक्स्टस ज्युलियस आफ्रिकनस याने २२१ एडी मध्ये २५ डिसेंबर रोजी येशूचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
तेव्हापासून ते आजपर्यंत आपण ख्रिसमस २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. रोमन लोकांच्या मान्यतेनुसार २५ डिसेंबरला सूर्याचा जन्म होतो, मदर मेरी यांच्या पोटी येशूने देखील याच दिवशी जन्म घेतला होता म्हणून या दिवसाला पवित्र दिवस मानलं जातं, तसंच हा दिवस नाताळ किंवा ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो.
नाताळच्या दिवशी घराबाहेर ख्रिसमस ट्री उभारण्याची परंपरा आहे. या दिवसाचे निमित्त साधून लोकं एकमेकांना गिफ्ट्स देतात, आनंद व्यक्त करतात. लहान मुलांच्या मनात तर ख्रिसमसच्या दिवशी सांता येऊन आपल्याला भेटवस्तू देऊन जाईल याची ओढ लागलेली असते. येशूच्या जन्माच्या वेळी मदर मेरी ही एका गोठ्यात राहायची आणि तिथेच येशूचा जन्म झाला होता. जगाला तारणारा जन्मला आहे ही आनंदवार्ता मेंढपाळांनी सर्वाना दिली होती म्हणून या दिवशी गोठा, मेंढ्या किंवा मेंढपाळांचे देखावे उभारले जातात. चर्चमध्ये धर्मगुरु येशूच्या जन्माची, त्याच्या बलिदानाची गोष्ट ऐकवतात. घरोघरी दिवशी विविध प्रकारचे केक बनतात, एकूणच काय एकमेकांमध्ये आदर आणि प्रेम भावना कायम राहावी तसेच येशूच्या शिकवणीमधून बोध घेऊन जीवन व्यतीत करावं असा या सणामागचा उद्देश आहे.