हजारो अनाथ लेकरांची माय झालेल्या सिंधुताई सपकाळ यांना ‘माई’ असे संबोधतात, त्यावर एकाने मला म्हटले होते की त्यांना आई म्हणायला हवे, पण मला वाटते एका मुलांची असते ती आई आणि हजारोंची असते ती ‘माई’, त्या अर्थाने ‘माई’ सिंधुताई सपकाळ म्हणजे ग्लोबल मदर होत्या असे मत मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यासाठी व्यक्तिशः आणि संस्थात्मक स्वरूपात ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो, बालगंधर्व रंगमंदिर येथे माईंच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून न्यायमूर्ती डिगे बोलत होते. यावेळी कृष्ण प्रकाश (महाराष्ट्र पोलीस प्रमुख, फोर्स वन, मुंबई), रवी नगरकर (व्यवस्थापकीय संचालक, कल्याणी टेक्नोफोर्ज लि.),ममता सिंधुताई सपकाळ, दीपक गायकवाड, विनय सपकाळ,सीमा घाडगे,माजी आमदार उल्हास पवार, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप,सागर ढोले पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, अहिल्यानगर आणि जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जीवन आनंद संस्थेचा पुरस्कार संदीप परब यांनी स्वीकारला. रुपये ५१,००० चा धनादेश, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुढे बोलताना न्यायमूर्ती शिवकुमार डिगे म्हणाले, आजच्या पिढीकडे अपयश, दु:ख पचवायची ताकद कमी झालेली आहे. विशीत निराश्रित झालेली अबला स्त्री ते पद्मश्री हा प्रवास करणाऱ्या सिंधुताईंची अपयश पचवण्याची, निराश न होण्याची काय ताकद असेल हे आजच्या पिढीने समजून घेण्याची गरज आहे. वेदनेला कोणतीही भाषा नसते, यामुळे माईंचे कार्य भाषेच्या भिंती ओलांडून पसरले, त्यांनी जगभर प्रवास करत अनेकांच्या दु:खावर मायेची फुंकर घातली आहे.
चांगले काम करणाऱ्याला बळ दिले पाहिजे ही माईंची शिकवण आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने अधोरेखित होते. आज पुरस्कार देणारी आणि ज्यांचा सन्मान होतोय त्याही सामाजिक संस्था आहेत. चांगले काम करणाऱ्या सामाजिक संस्था या समाजाच्या रक्तवाहिन्या असल्याचेही न्यायमूर्ती डिगे यांनी नमूद केले.
कृष्ण प्रकाश म्हणाले, सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाथांचे आयुष्य घडविले, त्यांच्याकडे कोणताही राजपाट नव्हता मात्र एखादा चांगला राजा जशी आपल्या समाजाची काळजी करतो, सर्वस्व समाजाला अर्पण करतो तोच हेतु, ध्येय माईंच्या कामातून दिसते. एका हाताने घेऊन दुसऱ्या हातापर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले, एका दिव्याने दुसरं दिवा प्रज्वलित होतो तसे माईंचे काम दिव्यासारखे होते. त्यांची प्रेरणा घेऊन अनेकजण काम करतील असा विश्वास कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला.
रवी नगरकर म्हणाले, माईंचे कार्य मोठे आहे. त्या अनेकांच्या जगण्याचा आधार बनल्या. आज कल्याणी ग्रुपच्या वतीने अनेक सामाजिक संस्थांना आम्ही मदत करत आहोत. या संस्था काही प्रमाणात स्वावलंबी व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या, स्नेहालयाच्या कामाची दखल घेतल्याबद्दल मी ऋणी आहे. माईंच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार म्हणजे स्नेहालय वर असलेल्या जबाबदारीची जाणीव नव्याने करून दिल्यासारखे आहे.
संदीप परब म्हणाले, यशोदामाई राष्ट्रीय पुरस्काराने संस्थेची जबाबदारी आणखी वाढली आहे. समाजातील अनाथांना माईने आश्रय दिला, त्यांना घडविले, आज आई – वडील, आजी – आजोबा यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, तसे करू नका असे आवाहन त्यांनी समाजाला केले.
प्रास्ताविक करताना ममता सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, “माईच्या प्रेरणादायी जीवनातून समाजसेवेची भावना जागृत व्हावी आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे न्यावा, या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या पुरस्काराने त्यांना नवी ऊर्जा मिळेल आणि समाजासाठी अधिक समर्पक कार्य करण्यास प्रेरणा मिळेल. आमच्याकडे जे काही ते आम्ही या पुरस्काराच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करत आहोत.समाजाच्या तळागाळात जाऊन प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करणे ही माईंच्या कार्याला खरी श्रद्धांजली आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रबोधनकार गणेश शिंदे आणि गायिका सन्मिता शिंदे यांच्या ‘मोगरा फुलला’ या सांगीतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विणया देसाई यांनी केले.