kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

डॉ. श्रीराम लागूंच्या पत्रांचा दरवळ रंगभूमीवर ! ; दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रा पत्री’ अभिवाचनाचे प्रयोग जोरदार सुरु

मराठी रंगभूमीवर वेगवेगळे अविष्कार आपण पाहत आलो आहोत. असाच एक आगळावेगळा प्रयोग सध्या रसिकांच्या मनावर रुंजी घालत आहे. ‘हसवाफसवी’ हे नाटकं पहिल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांनी दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. या पत्राच्या आठवणी आजही चांगलं काम करायला बळ देतात असं म्हणत, दिलीप प्रभावळकर यांनी नाट्यरसिकांसाठी खास पत्रप्रपंच आयोजित केला आहे. त्यांच्या या प्रपंचाला नाट्यरसिकांचाही उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.

दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रा पत्री’ या नावीन्यपूर्ण अभिवाचनाचे प्रयोग सध्या जोरदार सुरु आहेत. या आगळ्यावेगळ्या प्रयोगासाठी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांची त्यांना साथ लाभली आहे. आज पत्रात्मक संवाद कालौघात मागे पडलेला असताना बदामराजा प्रोडक्शन्स निर्मित ‘पत्रा पत्री’ हा रंगाविष्कार मंचावर येणं, त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळणे हे निश्चितच उत्सुकता वाढवणारं आहे. माधुरी गवांदे, निनाद कर्पे याचे निर्माते आहेत.

दिलीप प्रभावळकरांनी काय म्हटलं?

दिलीप प्रभावळकर याविषयी म्हणाले, पत्रलेखनामधील ओलावा आणि आपलेपणाची अनुभूती रसिकांना देण्यासाठी ‘पत्रा पत्री’ चा प्रयोग करण्याचं ठरवलं. ‘प्रासंगिक आणि विडंबनात्मक पद्धतीचं लेखन या पत्रांमध्ये आहे. प्रत्येक पत्राला एक कथा आहे. अशा पाच कथा आम्ही अभिवाचनासाठी निवडल्या आहेत.’ तात्यासाहेब आणि माधवराव या व्यक्तिरेखा बनून अनुक्रमे दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे पत्रांचं अभिवाचन करत आहेत. या ‘दृक आविष्कारा’चं दिग्दर्शन विजय केंकरे यांचं असून रंगावृत्ती नीरज शिरवईकर यांची आहे. संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.