Breaking News

प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांची प्रकृती गंभीर, अमेरिकेतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु

प्रसिद्ध तबला वादक, अभिनेते, संगीतकार झाकीर हुसैन यांची प्रकृती बिघडली आहे. झाकीर हुसैन यांना अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांना हृदयासंबंधीचा त्रास जाणवतो आहे. त्यांचे मित्र आणि प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरासिया यांनी ही माहिती दिली आहे. अमेरिका स्थित झाकीर हुसैन यांना रक्तदाबासंबंधीचा त्रास जाणवतो आहे अशी माहिती झाकीर हुसैन यांच्या एका निकटवर्तीयाने दिली. PTI ने हे वृत्त दिलं आहे.

झाकीर हुसैन हे मागील वर्षापासून हृदयविकाराने त्रस्त होते. सुमारे 2 वर्षांपूर्वी त्यांच्या हृदयात ब्लॉकेजमुळे त्यांना स्टेंटही देण्यात आला होता. पण आता एबीपी न्यूजला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यामुळे झाकीर हुसैन यांच्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी देखील तसंच आवाहन केलं आहे.

झाकीर हुसैन हे प्रसिद्ध दिवंगत तबला संगीतकार अल्लाह राखा खान यांचा मुलगा आहे.अनेक प्रसिद्ध भारतीय आणि परदेशी चित्रपटांसाठी त्यांनी तबला वाजवला आहे. झाकीर हुसैन यांनी वयाच्या 7 व्या वर्षी तबला शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या 12 व्या वर्षी देशभरात फिरताना त्यांनी परफॉर्म करण्यास सुरुवात केली.

सुमारे चार दशकांपूर्वी उस्ताद झाकीर हुसैन संपूर्ण कुटुंबासह अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थायिक झाले.झाकीर हुसैन यांना देश-विदेशातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या पुरस्कारांनी झाकीर हुसैन यांचा सन्मान

त्यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मविभूषण यासारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.झाकीर हुसैन यांना 1990 मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही मिळाला होता.

चार वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मान

2009 मध्ये 51 व्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उस्ताद झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, त्यापैकी त्यांना हा पुरस्कार चार वेळा मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *