जगभरात बदलत्या टेक्नोलॉजीनुसार बदलण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) भर देण्यात आला आहे. शिक्षणासाठी एआय उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेसाठी एकूण 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना अर्थसंकल्पात केली. याबाबत सरकार काय पाऊल उचलणार आहे याबाबतची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. एनडीटीव्ही समूहाचे मुख्य संपादक, संजय पुगलिया यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी खास बातचित केली.
निर्मला सीतारमण यांनी याबाबत म्हटलं की, एआय सारख्या टेक्नोलॉजीला कुणीही नाकारू शकत नाही. नव्या टेक्नोलॉजीसाठी तरुणांना सक्षम करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि नव्या टेक्नोलॉजीप्रमाणे त्यांना तयार करणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. यासाठी जुलै महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात पंतप्रधान इंटर्न स्कीम आणली आहे.
देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये तरुणांना इंटर्नशीपची संधी मिळणार आहे. दहावी, बारावी ते पदवीधर अशा सर्व तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळेल. यासाठी केंद्र सरकारने पैसे खर्च करुन कंपन्यांशी करार करुन इंटर्नशीप प्रोग्राम आणला आहे. यासोबत या अर्थसंकल्पात ट्रेनिंग फॉर एआय सेंटर बनवण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी परदेशातून एआय तज्ज्ञांची टीम बोलावली जाईल. या तज्ज्ञांकडून तरुणांना प्रशिक्षण दिलं जाईल, असंही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जागतिक कौशल्य आणि भागीदारीसह कौशल्य विकासासाठी पाच राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या भागीदारींमध्ये अभ्यासक्रम रचना, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, कौशल्य प्रमाणन चौकट आणि नियतकालिक पुनरावलोकन यांचा समावेश असणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणासाठी कृत्रिम प्रज्ञा उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे असे केंद्र स्थापण्यासाठी एकूण 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.