कन्नड अभिनेत्री आणि आयपीएस अधिकाऱ्याची सावत्र मुलगी रान्या रावला सोने तस्करीच्या आरोपाखाली अटक झाली आहे. तिच्याकडे १४.२ किलो सोने आढळले असून त्याची किंमत १२.८६ कोटी असल्याचे सांगितले जाते. यानंतर आता कारागृहात असलेल्या रान्या रावचा फोटो समोर आला असून हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. इंडिया टुडेने सदर फोटो समोर आणला आहे.
रान्या रावने जामिनासाठी अर्ज केला असून आर्थिक गुन्हे न्यायालयाने जामिन अर्जावरील निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवला आहे. जामिनासाठी झालेल्या सुनावणीत डीआरआयच्या वकिलांनी सांगितले की, रान्या रावने नियम तोडून कशाप्रकारे तस्करी केली, याचा समूळ तपास करायचा आहे, त्यामुळे तिची कोठडी आवश्यक आहे.
तसेच रान्या रावने या वर्षात एकूण २७ वेळा दुबईचा प्रवास केला असल्याचीही माहिती डीआरने दिली आहे. यामुळे तस्करीचे एक मोठे रॅकेट यात गुंतलेले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर रान्या रावच्या वकिलांनी बचाव करताना सांगितले की, डीआरआयने आधीच सर्व चौकशी केली आहे. तसेच पुढील चौकशीची आवश्यकता नसल्यामुळेच तिला न्यायालयीन कोठडीत पाठविले गेले आहे.
कोण आहे अभिनेत्री रान्या राव?
रान्या रावने कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे डीजीपी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्या रावला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिची कसून चौकशी करण्यात आली.