सरकारी कंपनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (इरेडा) शेअर्समध्ये २९ एप्रिल रोजी जोरदार वाढ झाली. इरेडाचे शेअर्स १० टक्क्यापेक्षा अधिक उडी घेत १९२ रुपयांवर पोहोचले तर शेअर्स शुक्रवारी १७०.६५ रुपयांवर बंद झाले होते. अलीकडच्या एका मोठ्या अपडेटनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी वाढ झाली असून इरेडाला सार्वजनिक उपक्रम विभागाकडून ‘नवरत्न’ दर्जा प्राप्त झाला आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी २१५ रुपये तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ४९.९९ रुपये आहे.
इरेडाच्या शेअर्सची किंमत आयपीओमध्ये ३२ रुपये निश्चित करण्यात आली होती. कंपनीचा आयपीओ गेल्या वर्षी २१ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. तर इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे शेअर्स २९ नोव्हेंबर २०२३ रोजी ५० रुपयांच्या किमतीत बाजारात सूचीबद्ध झाले. लिस्टिंग झाल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होत आहे. शेअर्सने अवघ्या पाच महिन्यात १९० रुपयांचा टप्पा ओलांडला असून कंपनीचे शेअर्स ३२ रुपयांच्या आयपीओ किमतीच्या तुलनेत ४४० टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत.
सार्वजनिक उपक्रम विभागाच्या ऑक्टोबर २०२३ च्या अधिसूचनेनुसार, भारतात १६ ‘नवरत्न’ कंपन्या आहेत, ज्यात IRCON, RITES, NMDC आणि RCF सारख्या कंपन्यांचा समावेश होता. तर आता इरेडाला ‘नवरत्न दर्जा’ मिळाल्यानंतर या सरकारी कंपनीच्या शेअर्सनी मोठी झेप घेतली आणि पूर्वीची विक्रमी पातळी गाठली.