kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार ‘गुलकंद’ १ मे २०२५ रोजी होणार प्रदर्शित

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, वेलक्लाऊड प्रॅाडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट नवीन वर्षात १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल माडियाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात फॅमिली एंटरटेनमेंट आणि कॅामेडीचे अनोखे कॅाम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. यामध्ये सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. ‘गुलकंद’चे सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया निर्माते आहेत. चित्रपटाचे नाव, भन्नाट टीम यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, ‘’या सगळ्यांसोबत मी आधी काम केलं असल्याने आमच्यात एक बॅाण्डिंग आहे आणि आमची हिच केमिस्ट्री यातही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली एंटरटेनर असून प्रेक्षकांना या मुरलेल्या गुलकंदाची चव चाखायला नक्कीच आवडेल. ही एक अशी कथा आहे, ज्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मजा घेऊ शकतात. ही अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आहे.’’

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, ‘’चित्रपटाची कथा ऐकताक्षणी मला आवडली. मुळात ही एक मुरलेली टीम आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कमाल आहे. आजच्या धावपळीच्या जगात प्रेक्षकांना असे हलकेफुलके विषय पाहायला आवडतात. हा चित्रपट पाहून प्रेक्षक हसतमुखाने थिएटरबाहेर पडतील. आपल्या प्रियजनांसोबतच्या आठवणी जपण्यासाठी आमचा हा खास प्रयत्न आहे.’’