समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ महामार्ग या प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भर दिला जात आहे. ८०० किलोमीटर लांबी असलेला हा महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाईल. या महामार्गामुळे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र एकमेकांना जोडली जातील. पण ठिकठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे. यावर नुकतंच मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्व आमदारांसोबत चर्चा केली आहे. शक्तीपीठ महामार्गाला कोणाचाही विरोध नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले, “सर्व आमदारांशी चर्चा केली. विरोध बिल्कुल नाही. सर्व आमदारांना भेटलो आहे. प्रकल्पाला मूठभर लोकांचा विरोध आहे. सर्व आमदारांनी शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दर्शवले आहे.”
कृती समितीला घेऊन देखील आमदार माझ्याकडे येऊन भेटणार आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावरुन शक्तीपीठ महामार्गाचे काम लवकर सुरु होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. भूसंपादनावरुन महामार्गाच्या कामाला विरोध झाला होता. त्यानंतर बांधकाम थांबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.
शक्तीपीठ महामार्ग शेतजमिनीवरुन जाणार असल्याने शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध केला होता. अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महामार्गाच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली होती. काही ठिकाणी धरणे आंदोलन, तर काही ठिकाणी रस्ता रोको आंदोलने करत शेतकऱ्यांनी प्रकल्पाला विरोध दर्शवला होता.