राज्यात उष्णतेत वाढ झालेली दिसून येत आहे. आज पुण्यात लोहगावमध्ये तापमान 39.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. शिवाय सोलापूरचे तापमान ही 40 अंशाच्या जवळपास होते. हे कडक उन्हाळ्याचे लक्षण मानले जाते. कोकणात रत्नागिरीमध्येही सर्वाधिक उष्णतेची नोंद झाली आहे. तर नांदेड, ठाणे आणि जालना यासह राज्यात उष्माघाताचे चार रुग्ण आढळले आहेत. आता तज्ञांनी इशारा दिला आहे की, येत्या काळात तापमान वाढणार आहे.
राज्यातल्या अनेक शहरांमध्ये तापमान हे 35 अंशाच्या पार गेले आहे. पुढच्या चार ते पाच दिवसात हे तापमान आणखी वाढेल असा अंदाज आयएमडी पुण्याचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ के. ए. होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. शिवाय महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात ही उष्णतेची लाट दिसत आहे असंही ते म्हणाले. कोकण किनारपट्टीवर ही येत्या काही दिवसात तापमान वाढेल असंही त्यांनी सांगितलं.
पुण्यात शिवाजीनगरमध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. मध्य महाराष्ट्रातील इतर प्रदेशांमध्ये, सोलापूर 39.1 अंश सेल्सिअस,सांगली 38.5 अंश सेल्सिअस आणि सातारा 38.2 अंश सेल्सिअस इतके सामान्यपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे. ज्यामध्ये 2-3 अंश सेल्सिअसचा फरक होता. दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत तापमानात वाढ होत राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या आकडेवारीनुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुण्यातील तापमानाचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. दरम्यान राज्यात मार्च, एप्रिल मे मध्ये उन्हाळा सुरू होतो. मात्र मार्च महिन्यात सरासरी पेक्षा जास्त तपमान असेल असा अंदाज होता असं होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जास्त तापमान दिसून येतं. कोकणातही तापमान वाढेल असे शास्त्रज्ञ के. ए. होसालिकर यांनी सांगितले आहे. त्याच बरोबर ज्या सुचना हवामान विभागाकडून दिल्या जातील त्यासर्वांनी पाळाव्यात असं आवाहन ही त्यांनी केलं आहे.
राज्यात कुठल्या शहरात रविवारी किती तापमान?
परभणी 37.9
उदगीर 37.1
कोल्हापूर 36.5
सातारा 37.6
धाराशीव 37.2
जेऊर 38.5
बारामती 36.4
सांगली 39
नाशिक 36.3
सोलापूर 39.4
पुणे 37.5