इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी आठवड्यातील 70 तास काम करा असा सल्ला दिल्यानंतर त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. जगप्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एसएन सुब्रमण्यम यांनी एक पाऊल पुढे जात कर्मचाऱ्यांनी आठवड्यात 90 तास काम केले पाहीजे असे मत मांडले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सुब्रमण्यम यांनी प्रश्न विचारण्यात आला होता की, एल अँड टीच्या कर्मचाऱ्यांना शनिवारीही कामावर का यावे लागते? 5 दिवसांचा आठवडा आपल्या इथे लागू का करण्यात येत नाही अशी या प्रश्नामागची खोच होती. या प्रश्नाला उत्तर देताना सुब्रमण्यम यांनी हे उत्तर दिले आहे.
Reddit या प्रश्नोत्तराच्या मंचावर या संभाषणाचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एसएन सुब्रमण्यम हे एका अंतर्गत बैठकीला संबोधित करताना दिसत आहेत.
सुब्रमण्यम यांनी म्हटले की, मला खेद वाटतो की मी तुम्हाला रविवारीही काम करायला लावू शकत नाही, तसे झाले असते तर मला आनंद झाला असता. कारण मी रविवारीही काम करतो. लार्सन अँड टुब्रोने या व्हिडीओबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
सुब्रमण्यम यांनी विकएंड घरी घालवण्याची कल्पना ही आपल्याला मान्य नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. त्यांनी म्हटले की, “घरी बसून काय करणार आहात ? किती वेळ तु्म्ही बायकोला बघत बसाल आणि बायको तुम्हाला बघत बसेल ?” सुब्रमण्यम यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन कामाला सुरूवात करण्याचीही विनंती केली.
“घरी बसून काय करणार आहात ? किती वेळ तु्म्ही बायकोला बघत बसाल आणि बायको तुम्हाला बघत बसेल ?”
सुब्रमण्यम यांनी आपले म्हणणे मांडताना अमेरिकी कर्मचारी आणि चिनी कर्मचारी यांच्यातील तुलना करून दाखवली. त्यांनी म्हटले की अमेरिकेतील कर्मचारी हा आठवड्याला 50 तास काम करतो आणि चिनी कर्मचारी हा आठवड्याला 90 तास काम करतो. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केलेल्या या विचारांवरून रेडीटवर कॉमेंट युद्ध सुरू झाले आहे. अनेकांनी हा अतिरेक असल्याचे म्हटले आहे तर काहींनी सुब्रमण्यम यांनी मांडलेले विचार योग्य असल्याचे म्हटले आहे. एका व्यक्तीने म्हटले आहे की मला आधी वाटायचे की एल अँड टी ही चांगली कंपनी आहे मात्र सुब्रमण्यम यांचे विचार पाहिल्यानंतर ते नारायण मूर्तींच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असल्याचे वाटू लागले आहे.