kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मलाही तुरुंगात असताना माझी औषधं मिळत नव्हती. असाच अनुभव केजरीवाल यांना देखील येत आहे – संजय राऊत

दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर त्रास आहे. परंतु, तुरुंगात त्यांना मधुमेहावरील औषधं मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांचं कुटुंब त्यांच्यापर्यंत औषधं पोहोचवू शकत नसल्याची तक्रार आप नेत्यांनी केली आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी न्यायालयात याचिका दाखल करून तुरुंगात इन्शुलीन देण्याची मागणी केली आहे. औषधांसाठी केजरीवालांना न्यायालयाचं दार ठोठवावं लागलं आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष तुरुंग प्रशासन आणि केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनीदेखील यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच राऊत यांनी ते तुरुंगात असताना त्यांच्याबरोबर तुरुंग प्रशासनाने केलेल्या वाईट व्यवहाराची माहिती दिली.

संजय राऊत म्हणाले, मलाही तुरुंगात असताना माझी औषधं मिळत नव्हती. असाच अनुभव केजरीवाल यांनादेखील येत आहे. केजरीवाल यांना हाय डायबिटीजचा (उच्च मधुमेह) त्रास आहे. मात्र तुरुंगात त्यांना इन्शुलीन आणि औषधं दिली जात नाहीयेत. सरकार आणि तुरुंग प्रशासनाने थोडी मानवता बाळगली पाहिजे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीच्या विधानसभेत केजरीवाल यांच्याकडे बहुमत आहे. तसेच ते एक सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. तुम्ही (भाजपा सरकार) त्यांना त्यांची औषधं देत नाहीत. त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यापर्यंत औषधं पोहोचवू देत नाही. याचा अर्थ तुम्ही तुरुंगात त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करताय का? तुरुंगात असताना मलाही खूप वाईट अनुभव आले आहेत. माझी औषधं माझ्यापर्यंत पोहोचवली जात नव्हती. औषधांसाठी मला झगडावं लागत होतं. आमच्या लोकांना आमची औषधं आम्हाला देण्यापासून रोखलं जात होतं. जर आम्हालाच अशी वागणूक मिळत असेल तर तुरुंगातील सामान्य कैद्यांची काय अवस्था असेल? दिल्लीचे माजी मंत्री मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही असाच त्रास सहन करावा लागत आहे. राजकीय बदला घेण्यासाठी तुम्ही या लोकांना तुरुंगात टाकलं आहे आता किमान त्यांना त्यांची औषधं तरी द्या.

खासदार संजय राऊत म्हणाले, आणीबाणीच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे अनेक मोठे नेते तुरुंगात होते. माझ्या माहितीप्रमाणे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतः वेगवेगळ्या तुरुंगांच्या तुरुंग अधिकाऱ्यांशी बोलायच्या. ज्या ज्या तुरुंगात या नेत्यांना ठेवलं होतं तिथे त्यांची योग्य व्यवस्था आहे का ते पाहायच्या. त्यांची औषधं, त्यांचं जेवण त्यांना मिळतंय का याची माहिती घ्यायच्या. या नेत्यांच्या सर्व गरजा तुरुंगात पूर्ण होतायत का त्यावर लक्ष ठेवायच्या. परंतु, देशातलं मोदी-शाहांचं खतरनाक आणि सैतानी सरकार असं काही करत नाही. ते मुख्यमंत्र्यांना औषधं मिळू देत नाहीयेत.