15 ऑगस्टला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. भारताच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा असणारा हा दिवस ‘कलर्स मराठी’वरील ‘इंद्रायणी’ या मालिकेतही जल्लोषात साजरा केला जाणार आहे. प्रेक्षकांची लाडकी इंदू भारतमातेच्या माध्यमातून आपलं देशावरील प्रेम व्यक्त करताना दिसणार आहे. स्वातंत्र्यदिनी तिने दिलेलं दमदार भाषण प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील. तुमच्या शाळेत ज्यापद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला जायचा त्याप्रमाणेच इंदूच्या शाळेतही जल्लोषात स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या शाळेतील दिवस नक्की आठवतील. 15 ऑगस्टला हा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस. स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून सर्व शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते. या दिवशी अनेक शाळा विद्यार्थ्यांसाठी निबंध किंवा भाषण स्पर्धा आयोजित करतात. त्याप्रमाणे ‘इंद्रायणी’ मालिकेतील इंदूच्या शाळेतही झेंडावंदन असतं.

‘इंद्रायणी’ मालिकेच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात इंदूच्या शाळेत झेंडावंदन असतं. या झेंडावंदनानिमित्त इंदू, अधू आणि गोपाळ यांनी एक नाटक बसवलं असतं. या नाटकात ‘इंद्रायणी’ भारतमाता बनते. भारतमातेच्या दृष्टिकोनातून इंदू एक छोटं भाषणदेखील देते. त्यानंतर सर्वत्र तिच्या नावाचा जयजयकार सुरू होतो. नाटकात इंदू भारतमाता झाली असून गोपाळ गांधीजी झाला आहे. तर अधू भगतसिंह झाला आहे.

स्वातंत्र्यदिनाबद्दल बोलताना ‘इंद्रायणी’ म्हणाली,”आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त झाला तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947. म्हणून हा दिवस आपण स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करत असतो. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आम्ही ‘इंद्रायणी’ मालिकेत एक छोटं नाटक बसवलं आहे. या नाटकात मी भारतमातेची भूमिका साकारली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त असं वेगळं नाटक करताना खूप आनंद होत आहे. सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप-खूप शुभेच्छा…जय हिंद, जय महाराष्ट्र!!!”.