उद्योगपती रतनजी टाटा पंचत्वात विलीन झाले आहेत. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित शाह वरळी येथील स्मशानभूमीत रतनजी टाटा यांच्या अंत्यविधीसाठी आले. यावेळी टाटा कुटुंबियांसह उद्योग, राजकारण यांसह विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्व वरळी स्मशानभूमी येथे उपस्थित होते. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. रतन टाटा यांच्या अंत्यविधीवेळी वरळी स्मशानभूमी बाहेर सर्वामान्य नागरिकांचीदेखील मोठी गर्दी जमली होती.

रतनजी टाटा यांची काल रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात प्राणज्योत मालवली होती. ते 86 वर्षांचे होते. रतनजी टाटा यांच्या निधनमुळे देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनमुळे देशाच्या उद्योग क्षेत्रासह समाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. रतनजी टाटा यांची रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना रात्री साडेबारा ते 1 वाजेच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रतनजी टाटा यांनी ट्विट करत आपली तब्येत चांगली असल्याची माहिती दिली होती. पण त्यानंतर बुधवारी (9 ऑक्टोबर) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास रतनजी टाटा यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. यानंतर काही तासांनी रतनजी टाटा यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली. रतन टाटा यांच्या निधननंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रतन टाटा यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांच्या कुलाबा येथील राहत्या निवासस्थानी नेण्यात आलं होतं. तिथे त्यांच्या कुटुंबिय, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांनी अंत्यदर्शन घेतलं होतं. यानंतर आज सकाळी 10 वाजता रतन टाटा यांचे पार्थिव त्यांच्या कुलाबा येथील राहत्या घराहून एनसीपीए येथे आणण्यात आलं होतं. यावेळी मुंबई पोलिसांनी रतन टाटा यांना मानवंदना दिली होती.

रतन टाटा यांचे पार्थिव आज सकाळी 10 वाजता मुंबईतील एनसीपीए येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह बॉलिवूड, उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी अत्यंदर्शन घेतलं होतं. सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रतन टाटा यांचे पार्थिव एनसीपीए येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्वसामान्यांची मोठी रांग लागलेली बघायला मिळाली होती.

दुपारी 4 वाजेनंतर रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळी स्मशानभूमीच्या दिशेला रवाना करण्यात आलं होतं. यावेळी एसीपीए ते वरळी स्मशानभूमी या मार्गावर ग्रीन कॉरिडर ठेवण्यात आला होता. रतन टाटा यांचे पार्थिव वरळी स्मशानभूमीत आणणल्यानंतर पारसी रितीरिवाजाने अंत्यविधी करण्यात आले. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वरळी स्मशानभूमीत विविध क्षेत्रातील दिग्गजांची गर्दी होती. तर स्मशानभूमीबाहेर सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होती. यावेळी वरळी स्मशानभूमी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. दरम्यान, रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर वरळी स्मशानभूमी येथून VIP निघून गेल्यानंतर सर्वसामान्यांनी मोठी गर्दी स्मशानभूमीत जाताना दिसली. सर्वसामान्यांनी स्मशानभूमीत मोठी गर्दी केलेली बघायला मिळाली. यावेळी पोलिसांनी रतन टाटा यांना मानवंदना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *