लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडावेत, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा असते. इथे मात्र चिखलफेक केली जात आहे, त्यामुळे ही बाब मला गांभीर्याने घ्यावी लागत आहे. महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतानाच आमदार सुरेश धस यांनी माझ्याविषयी जी टिप्पणी केली, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली. त्याचबरोबर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
तुमच्या राजकारणात कलाकारांना का खेचता? तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ असो. बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर भाष्य करताना तुमची गाडी आमच्यावर का घसरते? आम्ही कष्टाने मोठे झालो, नाव कमावले, आमची प्रतिमा का डागाळता, अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी पत्रकारांसमोर केली. यावेळी भावना मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
‘वीटभट्ट्या, जमीन बळकावून प्रचंड पैसा मिळवत इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणले जाते. असे विधान आ. धस यांनी केले होते.
इव्हेंटच्या बाबतीत महिला कलाकारांचीच नावे का घेतली जातात, पुरुष कलाकारांची का घेतली जात नाहीत? आम्ही कष्टाने मोठे झालो, नाव कमावले, आमची प्रतिमा का डागाळता, अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.
त्यांनी मानसिकता दाखवून दिली…
- माझ्यावर टिप्पणी करून त्यांनी स्वत:ची मानसिकता दाखवून दिली आहे, ही खेदाची बाब आहे. कलाकार म्हणून परळीच नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी काम केले आहे.
- यापुढेही काम करत राहणार. याआधीही अनेक राजकीय नेत्यांबरोबर, मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग परळीतील कार्यक्रमातील फोटोचा संदर्भ देऊन तुम्ही खोट्या गोष्टीला किती महत्त्व देत आहात? हे एक महिला कलाकार म्हणून मला अतिशय निंदनीय वाटते, असे त्या म्हणाल्या.