जालना जिल्ह्यातील आष्टी गावातील २९ वर्षीय कृष्ण सेलुकर फार मेहनतीने केबीसी सीझन १६मध्ये पोहोचला. त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. केबीसीमध्ये रक्कम जिंकल्यानंतर कृष्णने त्याचे काही अनुभव शेअर केले आहेत.

केबीसीमध्ये जाण्याचा विचार कसा आला?

  • माझी आई केबीसीचे सगळे सिझन बघते. त्यामुळे तिला नेहमीच वाटायचे आपल्यापैकी कोणी तरी तिथे जावे. आम्ही तीन भावंडे आहोत. आमच्या तिघांपैकी कोणीतरी त्या हॉटसीटवर बसावे, अशी तिची इच्छा होती. कोरोनाच्या काळात आम्ही अनेकदा यासाठी प्रयत्न केले. अनेकदा अपयशही यायचे. तरीही आम्ही प्रयत्न सोडले नाही. यामुळे तुमच्या सामान्य ज्ञानामध्येही वाढ होते.

ज्यावेळी केबीसीमधून फोन आता त्यावेळी तुमची प्रतिक्रिया कशी होती?

  • माझा आधी विश्वासच बसला नाही की, माझी निवड झाली आहे. भारतातून ज्या दहा जणांची निवड झाली त्यात मी एक होतो. खूप आनंदाचा हा क्षण होता.

केबीसी सीझन १६ पर्यंत पोहोचण्याचा तुझा प्रवास कसा होता?

  • हा प्रवास खूपच अवघड होता. माझी निवड झाली ती ‘इंडिया चॅलेंजर वीक’मध्ये झाली. प्ले अलॉन्गमध्ये निवड होणे, खऱ्या अर्थाने खूप अवघड आहे. कारण संपूर्ण भारतामधून १० स्पर्धकांची निवड करायची असते. त्यात महाराष्ट्रातून एक स्पर्धक निवडणे आणि यात माझा नंबर लागणे. ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. इथे मी सहज नाही पोहोचलो. अनेकदा प्रयत्न करून इथंवर पोहोचलो.

केबीसीमध्ये सहभागी होण्यामागे हेतू काय होता?

  • हे एक असे व्यासपीठ जिथे आपण आपले स्वप्न सत्यात उतरवू शकतो. त्यासोबतच आपल्याला महानायक अमिताभ बच्चन सरांना भेटण्याची, टीव्हीवर झळकण्याची संधी मिळते.

पहिल्यांदा हॉटसीटवर बसताना मनात काय भावना होत्या?

  • हॉटसीटवर बसताना मनात मिश्र भावना होत्या. अमिताभ बच्चन सर यांच्यासमोर आपण बसणार आहोत, आपण टीव्हीवर दिसणार आहोत, असंख्य लोक आपल्याला बघणार आहेत, माझा खेळ कसा होणार, यासाठी उत्सुकताही होती आणि आपण हे सगळे कसे हाताळणार, याची भीतीही होती. माझे हिंदीवर फारसे प्रभुत्व नसल्याने सरांशी कशा पद्धतीने बोलायला पाहिजे, याचेही थोडे दडपण होते.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉटसीटवर बसण्याचा अनुभव कसा होता?

  • माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता हा. आजवर मी कोणत्याच कलाकाराला बघितले नाही आणि भेटलोही नाही. त्यामुळे थेट अमिताभ बच्चन ज्यांनी अवघ्या फिल्म इंडस्ट्रीवर इतकी वर्षं अधिराज्य गाजवले आहे, त्यांना भेटण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

केबीसीमध्ये रक्कम जिंकल्यावर कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती?

  • माझ्या वडिलांना माझा अभिमान वाटावा आणि आयुष्यात मी काही तरी साध्य करू शकतो, हे दाखवून देण्याचे स्वप्न उराशी घेऊन मी या शोमध्ये सहभागी झालो. माझ्याकडे इंजिनियरिंगची पदवी आहे, परंतु कोव्हिड-१९ मुळे माझी नोकरी सुटली आणि जवळजवळ दोन वर्षे मी बेरोजगार आहे. या कारणामुळे माझ्या वडिलांशी माझे नाते तणावपूर्ण झाले होते. मात्र आज केबीसीमुळे हे नाते पूर्ववत झाले आहे. जिंकलेल्या रकमेचा चेक मी पहिल्यांदा माझा वडिलांच्या हाती सोपवला. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद खूप काही सांगणारा होता. आज माझ्या वडिलांना माझ्या बद्दल अभिमान वाटत आहे, केबीसीकडून ही एक मोठी भेट मला मिळाली आहे.

जिंकलेल्या रकमेतून पुढे काय करणार आहात?

  • माझे स्वप्न आहे की, मला एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करायची आहे. त्यासाठी मला आर्थिक पाठबळ नव्हते, ते पाठबळ मला या रकमेतून मिळणार आहे. एका मंदिरासाठी यातील काही रक्कम मी योगदान म्हणून देणार आहे. तसेच मागील दीड वर्षं मी ज्या मठामध्ये राहतोय, त्या मठासाठीही मला काही रक्कम द्यायची आहे. मी तिथल्या सरांना म्हणालो होतो, माझा पहिला पगार मी मठासाठी देणार आहे. परंतु पगाराआधी मला हे गॉड गिफ्ट मिळाले आहे. जे मी मठासाठी वापरणार आहे.