कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ७ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले असून त्यांना बी बियाणे व खते विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत १८५ कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांनी आवश्यक ती खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भातपेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. यासाठी लागणारे बियाणे जिल्ह्यातील १९२ कृषी सेवा केंद्रांमध्ये खरेदी केले होते. राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. यासाठी भरारी पथक स्थापन करून कृषी सेवा केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करत आहेत. अशाच एका तपासणीत देवगड, कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील ७ कृषी केंद्रे दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कृषी केंद्रामध्ये दरपत्रक न लावणे, साठा फलक न लावणे असा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांकसुद्धा जारी केले आहेत.
शेतकऱ्यांसाठी टोल फ्री नंबर
८८३०२९०८८७, ८८२२४४६६५५
९ भरारी पथके स्थापन..
शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी कृषी विभागाने ९ भरारी पथकांची स्थापना केली आहे. प्रत्येक तालुक्यात एक व जिल्ह्याच्या ठिकाणी एक अशी ९ पथके तैनात आहेत. एका पथकात ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. हे पथक ‘ऑन दि स्पॉट’ कोणत्याही कृषी केंद्रात जाऊन तेथील वस्तुस्थितीची तपासणी करू शकतात.