विद्याविहार पश्चिम येथील निळकंठ किंग्डम कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्यामुळे सुरक्षारक्षक श्री. उदय गांगण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले, यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका, एन विभागाचे मा. उपायुक्त (परिमंडळ-५) यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यांनी या दुर्घटनेतील जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
निळकंठ बिजनेस पार्क व निळकंठ किंग्डम कॉम्प्लेक्स येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फेरबदल करून मंजूर आराखड्याचे उल्लंघन झाले आहे, त्यामुळे अग्निसुरक्षा व इमारतीच्या स्थिरतेला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात ॲड. अमोल मातेले यांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या संपूर्ण अग्निसुरक्षा आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा.अनधिकृत फेरबदल करणाऱ्या विकासक/व्यवस्थापक/मालक/गाळेधारकांवर कायदेशीर कारवाई करून अनधिकृत बांधकाम निष्कासित करावे.सुरक्षारक्षकाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. मृत सुरक्षारक्षकाच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करावा.निळकंठ बिजनेस पार्कमधील सर्व अनधिकृत बांधकामे तातडीने निष्कासित करावी.
या दुर्घटनेमुळे भविष्यातील संभाव्य अपघातांची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी ॲड. अमोल मातेले यांनी केली. ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. कैलास कुशेर, तालुकाध्यक्ष श्री. अन्वर भाई दळवी, सरचिटणीस राहुल टिकेकर, युवक कार्याध्यक्ष अक्षय खिल्लारी आणि युवक मुंबई सरचिटणीस इमरान तडवी उपस्थित होते.अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Leave a Reply