kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

देशभरातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेशइंडिया टुडे ने जाहीर केली शंभर महिलांची यादी

बारामती लोकसभा मतदार संघासह महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशी घटना घडली असून देशातील अग्रणी मासिक ‘इंडिया टुडे’ ने जाहिर केलेल्या देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे.

इंडिया टुडे ने नुकताच हा सर्व्हे केला असून यात देशभरातील शंभर कर्तृत्ववान महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यवसाय आणि अन्य पातळ्यांवर कार्यरत असलेल्या देशभरातील महिलांचा अभ्यास केला आहे. राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपल्या काम आणि नागरिकांच्या प्रति आपली कर्तव्याच्या भूमिकेवर शंभर टक्के खऱ्या उतरत खासदार सुळे यांनी संसदेत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

संसदेतील त्यांची उपस्थिती, चर्चासत्रांतील सहभाग, विचारलेले प्रश्न, मांडलेली खासगी विधेयके आदी सर्वच पातळ्यांवर त्या देशभरातील खसदारांमध्ये सातत्याने अव्वल ठरत आहेत. याच कारणामुळे त्यांना संसद दोन वेळा महारत्न, तर तब्बल सात वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय अन्यही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुळे यांनी मिळाले आहेत. त्यांच्या या एकूण कार्याची दखल घेत देशभरातील कर्तृत्ववान महिलांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

माझ्यावर विश्वास ठेवून मला संसदेत पाठविणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येकाचा हा बहुमान – सुप्रिया सुळे

इंडिया टुडेने जाहीर केलेल्या शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीतील सहभागानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला असून आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हा बहुमान आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात, ‘देशातील अग्रणी मासिक ‘इंडिया टुडे’ यांनी जाहिर केलेल्या ‘टॉप १०० वुमन अचिव्हर्स ऑफ इंडिया’ या यादीत माझा समावेश करण्यात आला आहे. हा मोठा बहुमान आहे. हे शक्य झाले कारण बारामती लोकसभा मतदार संघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची आणि त्यांची सेवा करण्याची संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, आदरणीय पवार साहेब आणि जनतेने माझ्यावर टाकलेल्या या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी सदैव काम करीत आहे. या कामाला मिळालेली ही पोचपावती आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातील जनतेने मला आपल्यासाठी काम करण्याची संधी दिली, हि माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. याबद्दल मी कायम कृतज्ञ आहे. हा बहुमान माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या आणि मला आशीर्वाद देणाऱ्या प्रत्येकाचा आहे. त्यामुळे हा सन्मान तुम्हा सर्वांना अर्पण करताना मला अतिशय आनंद होत आहे’