kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिस सज्ज, ड्रोन कॅमेऱ्यांनी विसर्जन मिरवणूकांवर लक्ष

लाडक्या बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर आता दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. मुंबई पोलिस दलाच्या 23,400 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच 2,900 पोलीस अधिकारी आणि 20,500 पोलीस कर्मचारी विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्तासाठी सज्ज करण्यात आले आहे. यात 40 पोलीस उप-आयुक्त (डीसीपी) आणि 50 सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) बंदोबस्तावर देखरेख ठेवणार आहेत. लालबागच्या राजाच्या विसर्जनसाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.

मुंबईतून अनंत चतुर्दशीला होणार्‍या विसर्जनासाठी सर्व चौपाट्या आणि मिरवणूक मार्गावर प्रचंड सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांचा 23 हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर त्यासाठी उतरणार आहे. मुंबई महानगर पालिकेने देखील विसर्जनासाठी 12 हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहेत. 71 नियंत्रण कक्षांमधून या गणेश विसर्जन मिरवणूकीवल लक्ष ठेवले जाणार आहे.

मुंबईतील सीसीटीव्ही कॅमेरांच जाळं आणि ड्रोन कॅमेरे सुसज्ज ठेवले जाणार असून विसर्जन मिरवणुकीवर आकाशातून नजर ठेवली जाणार आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी पोलिसांचं विशेष सुरक्षा कवच असणार आहे. राज्य राखीव पोलीस बल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक यांची देखील तैनाती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी रस्त्याच्या वाहतूकीत देखील बदल केले आहेत. बेस्टच्या बसेसचे मार्ग बदलण्यात आले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर भक्ताच्या सोयीसाठी विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.