राष्ट्रपती भवनाताच्या आत असणाऱ्या प्रतिष्ठित असा ‘दरबार हॉल’ आणि ‘अशोक हॉल’ यांची नावे बदलण्यात आली आहेत. दरबार हॉलचे नाव आता गणतंत्र मंडप आणि अशोक हॉलचे नाव अशोक मंडप असे राष्ट्रपती भवनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधत राष्ट्रपती भवनातील दालनांची नावे बदलण्यात आली आहेत.

दरबार हॉल हे राष्ट्रीय पुरस्कारांचे सादरीकरण यासारख्या महत्त्वाच्या समारंभाचे आणि सोहळ्याचे ठिकाण आहे. तर अशोका हॉल हे मुळात बॉलरूम होते. सरकारने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘दरबार’ हा शब्द भारतीय राज्यकर्ते आणि ब्रिटिशांच्या न्यायालये आणि संमेलनांना सूचित करतो. भारताचे प्रजासत्ताक, म्हणजेच ‘गणतंत्र’ झाल्यानंतर त्याची प्रासंगिकता गमावली. ‘गणतंत्र’ ही संकल्पना भारतीय समाजात प्राचीन काळापासून खोलवर रुजलेली आहे, त्यामुळे ‘गणतंत्र मंडप’ हे स्थळाचे योग्य नाव आहे.