नाना पाटेकर हे ‘क्रांतीवीर’, ‘तिरंगा’ या आणि अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखले जातात. महत्वाचे म्हणजे त्यांचे फक्त चित्रपटच गाजले नाहीत. तर चित्रपटातील त्यांचे डायलॉगही मोठे लोकप्रिय ठरले आहेत. नाना पाटेकर हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या स्पष्टवक्तपणासाठी ओळखले जातात. त्यांच्याबरोबर काम केलेले अनेक कलाकार हे नाना पाटेकरांचे अनेक किस्से सांगतात. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगतात. आता नाना पाटेकरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्याबरोबर नाना पाटेकरही दिसत आहेत. नाना पाटेकर स्वत: ऑम्लेट बनवून आशिष विद्यार्थी यांना खाऊ घालताना दिसत आहेत. आशिष विद्यार्थी हे नाना पाटेकरांचा व्हिडीओ करताना दिसत आहेत. नाना पाटेकरांनी ऑम्लेट कसे उलटवायचे याची ट्रीकही या व्हिडीओमध्ये सांगितल्याचे पाहायला मिळत आहे. नाना पाटेकरांनी बनवलेले ऑम्लेट खाल्यानंतर आशिष विद्यार्थी यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्याची चवही उत्तम असल्याचे म्हटले आहे. चव तर उत्तम आहेच पण हा अनुभवही अफलातून असल्याचे त्यांनी म्हटले. साधेच आहे पण त्यांनी स्वत:च्या हाताने, प्रेमाने बनवले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आशिष विद्यार्थी यांनी लिहिले, “नाना तुम्ही घेतलेल्या काळजी आणि प्रेमाने मी भारावून गेलो आहे. तुम्हाला खूप प्रेम”, पुढे त्यांनी हार्ट इमोजी शेअर केली आहे.
आशिष विद्यार्थी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये अभिनेता पुष्कर जोगनेदेखील कमेंट केल्याचे पाहायला मिळाले. पुष्करने जोगने मस्त असे लिहित कौतुक केले आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स करीत या दोन दिग्गज कलाकारांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये”, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “तुमच्या दोघांसाठी मनात खूप आदर आहे. नानांना बघून आनंद झाला”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “नानांचा अभिनय आणि नाना मला खूप आवडतात”, असे म्हणत नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.