राज्यभरात नवरात्रीचा उत्साह आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये मुंबईत ठिकठिकाणी गरबा, दांडीया आणि विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पिकर लावला जातो. पण रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पिकर लावण्यास बंदी असते. तरीही नवरात्रीच्या दिवसांमध्ये प्रशासनाकडून एक किंवा दोन दिवसासाठी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावण्यासाठी मुभा दिली जाते. यावर्षी मुंबईत नवरात्रीच्या तीन दिवसांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाकडून याबाबतचा आदेश जारी करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून 9, 10, 11 ऑक्टोबर असे 3 दिवस लाऊडस्पिकर लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा याबाबतचा आदेश समोर आला आहे.
आदेशात नेमकं काय म्हटलं आहे?
ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० च्या परिच्छेद ५(३) नुसार ध्वनिक्षेपक ecF ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी सकाळी ०६.०० वाजेपासून रात्री १२.०० वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक कारणाकरिता करता येतो.
उपोद्घातात नमूद अ.क्र. २ अन्वये विविध उत्सवांकरिता आणि सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता वर्षभरातील १५ दिवस सकाळी ६.०० ते रात्री १२.०० पर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यांचे वापराबाबत सूट देण्यात आली असून उपोद्घातात नमूद अ.क्र.३ अन्वये ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यांच्या वापराबाबत जिल्ह्याच्या निकडीनुसार सुट देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार उपोद्घातात नमूद अ.क्र. ५ वरील आदेशान्वये सन २०२४ करिता १५ दिवसांपैकी १३ दिवस सकाळी ०६.०० वाजेपासून रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यांचा वापर करणेबाबत परवानगी देण्यात आलेली आहे.
तथापि, उपोद्घातात नमूद अ.क्र. ६ अन्वये पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी केलेल्या शिफारशी नुसार नवरात्रोत्व २०२४ करिता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचे वापराबाबत उपोद्घातातील अ.क्र.५ येथील आदेशात अंशतः बदल करुन पुढील तक्त्यात नमूदप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे
उपरोक्त तक्त्यात नमूद दिनांकास ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० च्या परिच्छेदमध्ये नमूद ध्वनीची विहीत मर्यादा राखणेच्या अटीवर तसेच सदर प्रकरणी भविष्यात ज्या सूचना/आदेश निर्गमित केल्या जातील अथवा भविष्यात जर उपरोक्त दिवशी निर्बंध लागू केले तर अशा निबंधाच्या अधीन राहून सकाळी ०६.०० वाजेपासून रात्री १२.०० वाजेपावेतो मुंबई उपनगर जिल्ह्यात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करणेबाबत परवानगी देण्यात येत आहे. सदरची परवानगी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० चे अधीन राहून देण्यात येत आहे. याशिवाय उपोद्घातातील अ.क्र.५ कडील नमूद कार्यालयाच्या आदेशात अन्य कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटलं आहे.