Breaking News

नवरात्र २०२४ : माहूर गडावर नवरात्र उत्सवास प्रारंभ

महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण व मूळ पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थान गडावर ३ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. ‘उदे गं अंबे उदे…’ च्या गजरात पहिल्या माळेला श्री रेणुकामातेच्या वैदिक महापूजेने प्रारंभ झाला. गुरूवारी सकाळी सात वाजता पंडित नितीन धुमाळ व संच, नाशिक यांच्या सुमधुर सनईवादन व वेदशास्त्री निलेश केदार गुरुजी व बटू यांच्या हस्ते अभिषेकांचे सहस्त्र आवर्तन मुख्य देवता श्री रेणुकामातेच्या पूजेने झाले. श्री रेणुकामातेच्या मुख्य गाभाऱ्यातील व परिसरात श्री तुळजाभवानी मंदिर, श्री परशुराम मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिरात एका पाषाणाच्या कुंडात मातृका भरुन त्यात सप्त धान्य टाकून, कुंडावर मातीचा कलश, त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, सभोवताली पाच उसाचे धांडे उभारुन आणि त्याआधारे कलशावर पुष्पहार चढवून सकाळी घटस्थापना करण्यात आली. पंचामृताने अभिषेक करण्यात आला.

घटस्थापनेनंतर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पदसिध्द सचिव मेघना कावली, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, अरविंद देव, दुर्गादास भोपी, भवानीदास भोपी, शुभम भोपी यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर कुमारिका पूजन करण्यात आले. पिवळ्या रंगाचे पैठणी महावस्त्र मातेला अर्पण करण्यात आले.

संस्थानच्या अध्यक्ष सुरेखा कोसमकर, सहा. जिल्हाधिकारी मेघना कावली व विश्वस्त मंडळी आदींच्या हस्ते महाआरती करण्यात आली. नंतर छबिना मिरवणूक काढण्यात येऊन परिसरातील परिवार देवतांची पूजा, नैवेद्य व आरती करण्यात आली. यावर्षी मुंबई येथील उद्योगपती नरेंद्र हेटे यांनी नवरात्र उत्सवानिमित्त सोन्याने गाठवलेले ५ फुट मंगळसूत्र व डायमंड बिंदी श्री रेणुकामातेला अर्पण केली.