Breaking News

आता अजमेरच्या दर्ग्यात शिव मंदिर असल्याचा दावा, राजस्थानच्या न्यायालयाने मंजूर केली याचिका

अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात संकट मोचन महादेव मंदिर असल्याचा दावा करणारी राजस्थान न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका सुनावणी योग्य असल्याचे अजमेर दिवाणी न्यायालयाने म्हणत मंगळवारी ही याचिका मंजूर करण्यात आली. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. दिवाणी न्यायालयाचे (पश्चिम) न्यायाधीश मनमोहन चंदेल यांनी ही याचिका स्वीकारली.

या प्रकरणी दर्ग्याचे एएसआय सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून अजमेर दर्गा शिवमंदिर आहे की नाही हे शोधण्यासाठी पुरावे गोळा करता येतील. बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने ही नोटीस बजावली. संभलमधील जामा मशिदीच्या सर्वेक्षणाच्या आदेशानंतर तेथील हिंसाचारानंतर अजमेर दर्ग्याच्या सर्वेक्षणासंदर्भातील हा आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे.

न्यायालयाने पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर ला ठेवली होती. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर दर्गा पूर्वी हिंदू संकट मोचन मंदिर असल्याचा दावा केला असून त्याच्या समर्थनार्थ कागदपत्रे आणि पुरावे सादर केले आहेत. १९१० मध्ये प्रकाशित झालेल्या हरविलास शारदा यांच्या पुस्तकातही या मंदिराचा उल्लेख आहे. गुप्ता यांनी इतर ही कागदपत्रे न्यायालयात सादर करून अजमेर दर्ग्याचे सर्वेक्षण करून त्याची मान्यता रद्द करून हिंदू समाजाला येथे पूजेचा अधिकार द्यावा, अशी मागणी केली.

न्यायालयाच्या आदेशानुसार अजमेर दर्गा समिती, अल्पसंख्याक विभाग आणि एएसआययांना नोटीस बजावण्यात येणार आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी वकील रामनिवास बिश्नोई आणि ईश्वर सिंह यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *