आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठलभक्तांचा महापूर आलेला दिसून येत आहे. सर्व मंदिरात एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम आणि भजन सुरू आहेत. मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ते विठ्ठलाचे रूप आणि वारकऱ्यांची वारी. महाराष्ट्रात पंढरीच्या वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. पंढरपूरला चंद्रभागेच्या तिरी स्नान करून विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी महिन्याभरापासूनच पायी वारी करतात. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात आज विठ्ठलभक्तांचा महापूर आला आहे.
आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक भाविक आवर्जुन पंढरपूरात दाखल होतात. प्रत्येकालाच पंढरपूरला जाणे शक्य नसते. पण विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ प्रत्येकालच असते. तुमचेही असेच असेल तर तुम्ही मुंबईतील प्रतिपंढरपूर मंदिराला भेट देऊ शकता. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक मुंबईतील वडाळा येतील ४०० वर्ष जुन्या प्रति पंढरपूर मंदिराला भेट देऊ शकता.
पंढरपूरच्या मंदिरामध्ये, विठोबा आणि त्याची पत्नी रुक्मिणी यांच्या मूर्ती वेगळ्या ठेवलेल्या आहेत. परंतू वडाळा येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती एकाच ठिकाणी आहेत. ४,००० चौरस मीटर मंदिर परिसरात गणपती आणि शिवाची मंदिरे देखील आहेत. एकदा मिठागरांत काम करताना कामगारांना या ठिकाणी विठ्ठल रखुमाईची मूर्ती सापडली आणि नंतर या ठिकाणी मंदिर स्थापन करण्यात आले, असे सांगण्यात येते. एकादशीच्या दिवशी या मंदिरात पंढरपूरात भरतो तसाच मेळा इथेही भरतो.
माहितीनुसार, हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे कारण भक्ती चळवळीचे कवी-संत संत तुकाराम यांनी १७ व्या शतकात येथे प्रथम मंदिराची पायाभरणी केली. त्यावेळी तिथे वडाच्या झाडांशिवाय काहीही नव्हते. आपल्या मिठाच्या व्यवसायासाठी शहरात फिरणारे संत तुकाराम एका वटवृक्षाखाली बसून उपदेश करीत असत. तिथेच आता मंदिर झाले आहे. मंदिराच्या इथे असलेला वटवृक्ष मंदिरापेक्षा जुना असल्याचे मानले जाते.
आज आषाढी एकादशी यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिर (प्रति पंढरपुर), वडाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भावीक दर्शनासाठी उपस्थित आहे. सुंदर फुलांची आरास, दिवे, माळा यासह मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. टाळ, मृदुंग आणि ढोल-ताशाच्या ठेक्यावर भाविक भजनाचा आस्वाद घेताय. दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहता यामुळे सदर परिसरातील रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत.