ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

भारताचे ज्येष्ठ उद्योगपती टाटा समुहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे निधन झाल्याची रात्री बातमी आली. ही बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली. त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. टाटा यांच्या निधनाची बातमी रात्री उशीरा आली. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचा जीवनप्रवास वयाच्या ८६व्या वर्षी थांबला. सर्वसामान्य कुटुंबीयांचे कारचे स्वप्न पूर्ण करून नॅनोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले टाटा यांच्या जाण्याने उद्योगविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तीची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रतन टाटा यांना सोमवारी पहाटे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूकडून सर्व शर्तीचे प्रयत्न सुरु होते मात्र रात्री उशिरा त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री उशिरा टाटा सन्स चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी ही बातमी अधिकृतरित्या जाहीर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *