अहमदाबादच्या मेघानीनगर निवासी परिसरात एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आणि हाहाकार उडाला. या विमानात एकूण २४२ प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि दोन वैमानिक होते. त्यापैकी फक्त एक प्रवासी वाचला असून इतर सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकीकडे विमानातील इतर सर्वांच्या मृत्यूमुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली असताना दुसरीकडे या एका व्यक्तीचा जीव वाचल्यामुळे नियतीचे आभार मानण्याच्या प्रतिक्रिया सामान्यांमधून उमटत आहेत. इतक्या भीषण अपघातात ही व्यक्ती वाचल्यामुळे हा चमत्कार असल्याच्याही प्रतिक्रिया उमटत असल्या तरी असं घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही!

अहमदाबादमध्ये नेमकं काय घडलं?

अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी दीडच्या सुमासार एअर इंडियाचं AI171 हे बोईंग ७८७ श्रेणीतील प्रवासी विमान विमानतळाजवळच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं. या विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता. त्यात विमानातील सर्व क्रू मेंबर्स आणि दोन्ही वैमानिकांचाही मृत्यू झाला. मात्र, यातून मूळचे लंडनचे असणारे भारतीय वंशाचे नागरिक विश्वास रमेश यांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे अपघात स्थळाहून विश्वास रमेश स्वत: चालत बाहेर पडले आणि रुग्णवाहिकेत जाऊन बसले.

“विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर पुढच्या ३० सेकंदांमध्येच मोठे आवाज यायला लागले आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांत विमान कोसळलं. मला शुद्ध आली तेव्हा माझ्या आसपास सगळीकडे लोकांचे मृतदेह होते. मी प्रचंड घाबरलो होतो. मी उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो. तिकडे सगळीकडे विमानाचे जळते तुकडे पसरलेले होते. कुणीतरी मला पकडलं आणि रुग्णवाहिकेत नेलं आणि तिथून रुग्णालयात आणलं”, असं विश्वास रमेश यांनी सांगितलं.

दरम्यान, अशा प्रकारे चहूबाजूंनी मृ्त्यूनं वेढलेलं असतानाही त्यावर मात करून नियतीचा पराभव करणारे विश्वास रमेश हे एकटेच नाहीत. याआधीही अशाच काही भीषण अपघातांमध्ये चमत्कार वाटावा अशा प्रकारे बचावलेले प्रवासीही आहेत. अशीच एक घटना १९८७च्या ऑगस्ट महिन्यात घडली होती. मॅकडोनाल्ड डगलसचं MD-82 हे विमान १४९ प्रवासी व सहा क्रू मेंबर्ससह उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांत कोसळलं होतं. डेट्रॉइट मेट्रोपोलिटन विमानतळावरून या विमानानं उड्डाण घेतलं होतं. वैमानिकाच्या चुकीमुळे हे विमान कोसळल्याचं नंतर निष्पन्न झालं. या अपघातात एक चार वर्षांची चिमुकली बचावली होती. सिसेलिया सिचेन असं तिचं नाव होतं.

२०१३ साली सीएनएननं ‘Sole survivor’ ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित केली होती. यात सिसेलया सिचेनची कथा प्रामुख्याने दर्शवण्यात आली होती. पण तिच्यासह इतरही तीन जणांच्या अशाच आश्चर्यकारक बचावाच्या कहाण्या यात दाखवण्यात आल्या होत्या.

२००९ साली येमेनिया एअरवेजच्या विमानाचा अपघात झाला होता. त्यात १२ वर्षांची बहिया बकारी ही मुलगी वाचली होती. या अपघातात १५२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हिंद महासागरात हे विमान कोसळल्यानंतर विमानाच्या एका तुकड्याच्या सहाय्याने पाण्यावर तरंगताना ती काही मच्छिमारांना सापडली होती.

१९८५ साली अशाच विमान दुर्घटनेतून बचावलेला जॉर्ज लॅमसन ज्युनिअर नशीबवान ठरला. लॉकहीड येथे कोसळलेल्या L-188 Electra मध्ये ७० प्रवाशांचा मृत्यू झाला. फक्त १७ वर्षांचा लॅमसन बचावला. उड्डाणानंतर काही क्षणात विमानाला आग लागली. हवेतच स्फोट झाला आणि विमानाचे दोन तुकडे झाले. यात लॅमसन तो बसलेल्या खुर्चीसकट एका हायवेवर जाऊन पडला. असाच काहीसा प्रकार २००६ साली केंटकीमध्ये घजला. बॉम्बार्डियर सीआरजे १०० विमानाला अपघात झाला. यात ४९ जण दगावले. फक्त जेम्स बचावला.

हवानामधील अपघात – ११२ ठार

२०१८ मध्ये हवानामध्ये अशाच एका प्रवासी विमानाला अपघात झाला. विमानात एकूण ११३ जण होते. अपघातात १०९ जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर चार जणांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी तिघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पण चौथ्या प्रवाशानं मृत्यूशी कडवी झुंज दिली आणि जिंकलीदेखील. २०१९ च्या मे महिन्यात त्याला रुग्णालयातून डिसचार्ज देण्यात आला.

लष्करी विमानांच्या अपघाताच्या घटना

वेगवेगळ्या देशांमध्ये लष्करी विमानांच्या अपघातांमध्ये अशाच प्रकारे चमत्कारिकरीत्या फक्त एका व्यक्तीचे प्राण वाचल्याच्या घटना समोर आल्या आहे. १९९१ मध्ये इंडोनेशियाच्या हवाई दलाचं लॉकहीड सी-१३० हे विमान जकार्ताहून टेकऑफ घेतल्यानंतर काही वेळेत इंजिनला आग लागल्यानंतर कोसळलं. यात विमानातील १३४ जणांचा मृत्यू झाला तर विमान जिथे कोसळलं तिथले २ नागरिकही दगावले. फक्त एक व्यक्ती वाचली. विमानाच्या एका वैमानिकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण नंतर त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *