ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यासाठी व्यक्तिशः आणि संस्थात्मक स्वरूपात ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यंदाचे हे तिसरे वर्ष असून डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, अहिल्यानगर आणि जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवार, ४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५. ०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान मा. न्यायमूर्ती शिवकुमार डिगे, उच्च न्यायालय, मुंबई भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. कृष्ण प्रकाश (महाराष्ट्र पोलीस प्रमुख, फोर्स वन, मुंबई) आणि मा. श्री. रवी नगरकर (व्यवस्थापकीय संचालक, कल्याणी टेक्नोफोर्ज लि.,पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रुपये ५१,००० चा धनादेश असे आहे.
डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी (संचालक, स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अहिल्यानगर ) यांनी दत्तक विधानाच्या माध्यमातून अनाथ बालकांचे पुनर्वसन आणि अल्पवयीन मातांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या २२ वर्षांपासून अपार मेहनत घेतली आहे. त्यांच्या अथक कार्यामुळे अनाथ बालकांना आणि दुर्बल महिलांना नवा आधार मिळत आहे.
जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग ही २०१३ पासून रस्त्यावरील वंचित, निराधार, वयोवृद्ध, आणि मानसिक रुग्णांसाठी कार्यरत आहे. संस्थापक मा. श्री. संदीप परब यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था अन्न, वस्त्र, निवारा, आणि वैद्यकीय मदतीच्या माध्यमातून गरजूंसाठी आधारस्तंभ ठरत आहे.
या पुरस्काराबाबत माहिती देताना माईंच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ (अध्यक्षा,सप्तसिंधु ) म्हणाल्या, “माईच्या प्रेरणादायी जीवनातून समाजसेवेची भावना जागृत व्हावी आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे न्यावा, या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. समाजाच्या तळागाळात जाऊन प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करणे ही माईंच्या कार्याला खरी श्रद्धांजली आहे. या पुरस्काराने त्यांना नवी ऊर्जा मिळेल आणि समाजासाठी अधिक समर्पक कार्य करण्यास प्रेरणा मिळेल. पुरस्कार निवड कमिटीमध्ये मी स्वतः ,श्री दिपकदादा गायकवाड आणि विनय सिंधुताई सपकाळ यांच्या एकत्र विचार विनिमयातूनच ही नावे निश्चित करण्यात आली आहेत.”
माईंच्या कार्याचा वारसा पुढे नेताना ममता सिंधुताई सपकाळ यांनी सांगितले की, “ममता बाल सदन (सासवड), सन्मती बाल निकेतन (मांजरी), मनःशांती छात्रालय (शिरूर), सावित्रीबाई फुले वसतिगृह (चिखलदरा) या चार ठिकाणी संस्थेचे कार्य सुरू आहे. सुमारे ३१० मुले-मुली येथे शिक्षण घेत आहेत. तसेच वर्धा येथील गोपिका गो रक्षण केंद्रामध्ये २१८ भाकड गाईंचा सांभाळ केला जात आहे. माईंचा त्याग आणि समर्पण या प्रेरणादायी वारशाला अधिक विस्तार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन माई परिवारातर्फे ममता सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे.