Breaking News

रायगड जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांच्या फळ पिकविम्याचे पैसे ३ जानेवारीपूर्वी अदा करा;कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश…

पुनर्रचित हवामान आधारीत फळ पिकविमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह ३ जानेवारीपूर्वी अदा करावेत असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील ७५०० हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारीत फळ पिकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ३५०० शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषीविमा कंपनीने २९४० शेतकऱ्यांचे ९ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही.  याविरोधात तळा येथील शेतकऱ्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

त्यासंदर्भात खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने व उपस्थितीत आज मंत्रालयात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, कृषीआयुक्त प्रवीण गेडाम दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. तसेच भारतीय कृषी पीकविमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एम. एस. सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास पायगुडे, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत राऊत व नामदेव साळवी तसेच कृषीविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार सुनील तटकरे तसेच महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी कोकणातील इतर जिल्ह्यांपेक्षा रायगड जिल्ह्यात फळपिक विम्याच्या हप्त्याची रक्कम मोठी असल्याकडे लक्ष वेधले. त्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढील हंगामात हप्त्याची रक्कम सर्वत्र समान करण्याची सूचना कृषी आयुक्तांना केली.