आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा वाढदिवस आहे. ओडिशा दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना आईची आठवण झाली. त्यांनी पंतप्रधान आवास योजतेतंर्गत घर मिळालेल्या आदिवासी कुटुंबाला भेट दिली आणि संवाद साधला. यावेळी त्यांना आदिवासी महिलेने खिरी खायला दिली. या प्रसंगाबद्दल सांगताना पंतप्रधान मोदींना आईची आठवण झाली. भुवनेश्वर येथे झालेल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आई हीराबेन यांची आठवण झाली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “इथे येण्यापूर्वी मी आपल्या एका आदिवासी कुटुंबाच्या गृह प्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या कुटुंबालाही नवीन घर मिळाले आहे. त्या कुटुंबाचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरील संतोष मी कधीही विसरू शकत नाही. त्या आदिवासी कुटुंबाने मला, माझ्या बहिणीने मला आनंदाने खिरी खाऊ घातली. मी जेव्हा खिरी खात होतो, तर आईची आठवण येणे स्वाभाविक होते.”
मोदी पुढे म्हणाले, “कारण जेव्हा माझी आई जिवंत होती, तेव्हा मी वाढदिवसाला नेहमी आईचे आशीर्वाद घ्यायला जायचो. आणि आई मला गूळ खाऊ घालायची. पण, आता आई तर नाहीये. आज एका आदिवासी आईने खीर खायला देऊन मला वाढदिवसाला आशीर्वाद दिला.”
“हा अनुभव, ही भावना माझ्या संपूर्ण आयुष्याची कमाई आहे. गाव, गरीब, दलित, वंचित, आदिवासी समाजाच्या आयुष्यात होत असलेला हा बदल. त्यांचे हे सुख मला आणखी काम करण्यासाठी प्रेरणा देतात”, असे मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशा दौऱ्यात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरे मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी भेटी दिल्या. या कुटुंबीयांसोबत मोदी यांनी गप्पा मारल्या.