हिट अँड रन प्रकरणामुळे महानगरांमधील पब, नाईट क्लब, बार आणि हुक्का पार्लर्समध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अनधिकृत जागांवर बांधण्यात आलेले अनेक बार, नाईट क्लब, पब, नाईट क्लब, बार आणि हुक्का पार्लर्स पहाटेपर्यंत सुरु असतात, त्यातून बाहेर पडणारे तळीराम नशेधुंद अवस्थेत बेदरकारपणे त्यांची वाहने हाकत असतात. असे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी सांगितले.
लोअर परेल कमला मिल परिसरात असलेले अनेक नाईट क्लब रात्री सुटल्यानंतर तेथे रस्त्याच्या दुतर्फा लांबचलांब वाहनांच्या रांगा लागून कर्कश होर्न वाजवत असल्याने त्याचा त्रास सामान्यांना सोसावा लागत आहे. असेच चित्र मुंबईच्या वांद्रे (प), जुहू,खार,सांताक्रूझ (प), साकीनाका, ओशिवरा, अंधेरी, मालाड, दहिसर याभागात दिसून येते. मुंबईतील अनेक नाईट क्लब, बार, पब आणि हुक्का पार्लर यांना मुंबई महानगर पालिकेच्या व अग्निशमन विभागाच्या परवानग्या नाहीत. यातील अनेक हुक्का पार्लर आणि पब हे इमारतींच्या टेरेसवर सुरु आहेत. ह्या सर्व अनधिकृत प्रकारांना मुंबई पोलीस आणि मुंबई महानगर पालिकेचा वरदहस्त आहे. पहाटे उशिरापर्यंत नियमबाह्य सुरु आलेले सर्व हुक्का पार्लर, क्लब, पब आणि बार यांच्याविरुद्ध वेळेत कारवाई झाली नाही तर पुण्यात झालेल्या प्रकारची पुनरावृत्ती होत राहील. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व मुंबई युवक अध्यक्ष अमोल मातेले यांनी केला.
मुंबईतील सर्व अनधिकृत बार, नाईट क्लब, पब, नाईट क्लब, बार आणि हुक्का पार्लर्सविरुद्ध ऑडीट करून पुढील कारवाई तात्काळ करावी, अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने नियमबाह्य सुरु असलेल्या ह्या सर्व ठिकाणांना टाळे लावा आंदोलन सुरु करण्यात येईल आणि उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आपली राहील असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी दिला.