पुणे कार अपघातात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अग्रवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे समजत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत भाष्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याचे समोर आले आहे. पुण्यात दारूच्या नशेत गाडी चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांची छोटा राजनसोबत संबंध असल्याचं उघड झालं आहे.

भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात वेदांत अग्रवालच्या आजोबांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्या प्रकरणात सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे.

मात्र या प्रकरणात मोक्का लावणं अपेक्षित असनाताही पुणे पोलीसांनी केवळ आयपीसीची कलमं लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आरोपत्रही दाखल करेपर्यंत विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक झाली नव्हती.