राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवव्यात, आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

तर, आता सायंकाळी पाच वाजता मुळशी धरणातून ५ ते ७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. पुण्यातील पूरस्थिती अटोक्यात आली नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एकता नगर परिसरात आढावा घेतला. यावेळी नागरिकांनी येथील अडणचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवला.

तर, दुसरीकडे मुंबईतही पावसाने चांगलाच जोर धरला असून मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. परिणामी कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत गुरुवारी मोठी वाढ झाली. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बदलापुरातून उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहत होती. बदलापुरात १६.५० मीटर ही इशारा पातळी आहे. तर १७.५० मीटर ही धोका पातळी आहे.

केंद्रीय यंत्रणांकडून अटक टाळायची असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित यांच्यावरील आरोपांच्या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकल्याचा सनसनाटी आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. तसंच, या शपथपत्रांसाठी देशमुखांवर दबाव टाकल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा. श्याम मानव यांनी केला होता. यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी पाहूयात.