आंध्र प्रदेशात तिरुपती येथील तिरुमला बालाजी मंदिरातील लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचे अंश सापडल्यानंतर विविध मंदिरातील प्रसादांच्या गुणवत्तेबाबत नवीन वादाला तोंड फुटले आहे. अशातच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रसादात उंदरांचा सुळसुळाट झाल्याचा दावा केला जात आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून भक्तांना दिल्या जाणाऱ्या लाडवांचे पॅकेट ठेवलेल्या ट्रेमध्ये उंदीर आढळले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु या व्हिडिओमागील सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.
व्हिडिओमध्ये मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रसादाप्रमाणे पॅकिंग असलेली लाडवांची काही पाकिटं दिसत आहेत. यात काही उंदीर असल्याचं व्हिडिओत दिसतं. तसंच अनेक पाकिटंही कुरतडलेली आढळून आली आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे. या व्हिडिओची चौकशी करावी लागेल, असे मंदिर ट्रस्टच्या सचिव वीणा पाटील यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
सिद्धिविनायक मंदिर समितीचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तो व्हिडिओ आमच्या मंदिरातील नाही. हे कुणाचं तरी षडयंत्र नाही. तो व्हिडिओ कधीचा आहे, कुठला आहे, हे काहीही समजत नाही. फक्त प्लॅस्टिकमध्ये बंद काहीतरी असल्याचं दिसत आहे. त्यानंतर कुणीतरी त्याचा फोटो काढलाय. आमच्याकडे खूप स्वच्छता आहे, मात्र व्हिडिओत अगदीच उकिरडा दिसत आहे. हा फेक व्हिडिओ आहे, असा दावा सदा सरवणकर यांनी केला आहे.