पुणे : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आणि प्रेरणा आहे. त्यांचे स्मारक राज भवनावर व्हावे, ही संभाजी ब्रिगेडची गेली अनेक वर्षा पासूनची मागणी आहे.पण राज्य सरकारला केवळ निवडणुका आल्यावरच शिवस्मारक आठवण होते. मात्र, आगामी काळात राज्यभावनावर शिवस्मारक व्हावे, यासाठी संभाजी ब्रिगेड राजभवनावर ‘कुदळ मोर्चा’ घेऊन जाणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड. मनोज आखरे यांनी आज दिला आहे.
संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय ‘लोकशाही जागर महामेळावा…’ आज (दि.23) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. महामेळाव्यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अँड. मनोज आखरे बोलत होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अँड. मनोज आखरे म्हणाले, फसणवीस सरकार असताना त्यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक तयार करण्याचा घाट घातला होता. मात्र तेथे एक वीट सुद्धा बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यासाठी तरतूद करण्यात आलेले 2700 कोटी रुपये हे पाण्यात गेले. तेव्हा देखील संभाजी ब्रिगेडने शिवस्मारक राजभवन येथे साकारावे, अशी मागणी केली होती. पण त्या मागणीला सरकारने गांभीर्याने घेतले नाही. आता संभाजी महाराजांच्या पुतळ्यांचे आंदोलन झाल्यावर आपल्याला शिवस्मारकाचे आंदोलन हाती घ्यायचे आहे. यासाठी आगामी काळात संभाजी ब्रिगेड राजभवनावर ‘कुदळ मोर्चा’ घेऊन जाणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या बाबतीत बोलताना अँड. मनोज आखरे म्हणाले, राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आपलाच दांडा, झेंडा आणि अजेंडा विधानभवनात गेला पाहिजे. आपण शिवसेना ठाकरे गटाकडे 27 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या कामाला लागा, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
मेळाव्या मागची भूमिका स्पष्ट करून महासचिव सौरभ खेडेकर म्हणाले, आपल्या देशाच्या शेजारी जी अवस्था आहे, त्याकडे पाहता आपण अधिक जागृत होवून काम केले पाहिजे. आगामी काळात काही लोकांचा ‘कार्यक्रम’ करण्याची आता गरज आहे. तसेच महाराष्ट्राला संघटना फोडणे, पक्ष फोडणे या गोष्टी नवीन नाहीत; पण अशा लोकांचा बंदोबस्त करणे देखील गरजेचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला सन्मान जनक जागा मिळाल्या तर आपलेही प्रतिनिधी विधानसभेत जातील. मात्र सन्मान जनक जागा न मिळाल्यास आपण पक्षासाठी वेगळी भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा देखील खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे म्हणाले, संभाजी ब्रिगेडचा संघर्ष हा फॅसीझम विरुद्ध समतेचा आहे मात्र 2014 पासून आपल्या देशात लोकशाही संपवण्याचे काम सुरू आहे पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्रातील समतावादी विचार पुरोगामी विचार उत्तरेत जाऊ नये म्हणून आर एस एस आणि ब्राह्मणवादी विचारांच्या पक्षांनी संघटनांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्यासाठी संघटना फोडीचा पक्ष फोडीचा राजकारण केलं आहे परंतु अशा ब्राम्हणवादी व आरएसएसवादी विचाराने आमचा आव्हान आहे की तुम्ही परिस्थिती कितीही विषमतावादी बनवाल राज्यात दंगली घडवण्याचे विचार करा पण जोवर ब्रिगेडिचा विचार येथे आहे तोवर मंदिर आणि मस्जिद शांतच असेल एकीकडे संविधान , आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे असं दुहेरी दुष्टचक्र निर्माण करायचं काम सध्या सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे जमीन आदानींना विकली आणि आकाश अंबानींना विकलं ते कोणत्या कायद्याखाली ही लोकशाही आहे का? अशावेळी जनप्रबोधन करणं हे संभाजी ब्रिगेडची जबाबदारी आहे.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर मामा देशमुख,प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे, प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, हरियानाचे अध्यक्ष मांगीराम चोपडे, अभिमन्यू पवार, प्रा. प्रेमकुमार बोके, डॉ. सुदर्शन तारक, सतीश वासावे, संतोष शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
मेळाव्यासाठी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे, पुणे शहर अध्यक्ष अविनाश मोहिते, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, महानगरध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा सचिव तेजश्री पवार, उपाध्यक्ष जोतिबा नरवडे, कार्याध्यक्ष अविनाश घोडके, सरचिटणीस सिद्धार्थ कोंढाळकर, जिल्हा सचिव निलेश ढगे, कार्याध्यक्ष साजिद सय्यद, मावळचे दिनकर केदारी, शिवाजी पवार, रंजीत बिराजदार, अशोक फाजगे, निलेश कांबळे, राजाराम गाजरे, कुमार गायकवाड, दिनेश बिरवाडकर, संतोष कराळे, रेखाताई कामठे, महेश पवार, अर्चना गव्हाणे, वेंकट मानपिडे, राजेश अडसूळ, अर्जुन जागडे आदींसह राज्य भरातून हजारो कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार उमाळे आणि आभार डॉ संदीप कडलक यांनी मानले.