दि पूना मर्चेंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिल्या जाणारा आदर्श व्यापारी पुरस्कार २०२४-२५ जाहीर करण्यात आले आहेत. चेंबरच्या सभासदांमधून दिला जाणारा पुरस्कार मे. पुरणचंद अॅन्ड सन्स्चे संचालक सतीश पुरणचंद गुप्ता यांना घोषित करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार व सुप्रसिद्ध हिरे व्यावसायिक गोविंद ढोलकिया यांच्या हस्ते सतीश गुप्ता यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
या पुरस्काराची घोषणा चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी केली. या वेळी उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, प्रवीण चोरबेले उपस्थित होते
सतीश गुप्ता हे पुण्यातील प्रमुख हॉटेल व्यवसायिक व नामांकित शैक्षणिक संस्थांना खाद्य सामग्री पुरवठा करणारे प्रतिष्ठित व्यापारी आहेत. त्यांनी १७व्या वर्षी किराणा मालाच्या व्यवसायात पाऊल ठेवले आणि आज एक नावाजलेले व्यवसायिक म्हणून ते ओळखले जातात. वक्तशीरपणा, सचोटी आणि समाजसेवेसाठी सतीश गुप्ता हे प्रसिद्ध आहेत. आज त्यांच्याकडे विविध व्यवसायाच्या माध्यमातून २५०० पेक्षा जास्त कामगारांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.
पुरस्कार वितरण समारंभ २० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता जयराज स्पोर्ट्स अँड कन्वेन्शन सेंटर, क्रोम बॅक्वेट, कोंढवा, पुणे येथे होणार आहे.