Breaking News

ज्येष्ठ  वास्तुविशारद  संजय उमराणीकर यांना पहिला  “भारतीय कला प्रसारिणी सभा वास्तुविद्या जीवन गौरव पुरस्कार” प्रदान 

पुणे : भारतीय वास्तु कलेला दीर्घ परंपरा, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशातील ऐतिहासिक आणि आधुनिक शहरे बसविण्यात, शहरांची ओळख निर्माण करण्यात देशातील वास्तुविशारदांचे योगदान बहुमूल्य आहे. पुण्यात अभिनव कला महाविद्यालय आधुनिक विश्वकर्मा घडविण्याचे काम करत आहे, पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे मात्र इथे पर्यटन किंवा आवर्जून बघायला जावे अशा मोजक्याच कलाकृती आहेत, अलीकडे तर शहराचे सर्व प्रवेशद्वार विद्रूप झाल्याचे दिसते, यामुळे शहराला आकर्षक, सौंदर्यीकरण करण्याची  जबाबदारी वास्तुविशारदच्या विद्यार्थ्यांनी घ्यावी असे मत पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी व्यक्त केले.  

पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे भारतीय कला प्रसारिणी सभा वास्तुविद्या ,’जीवन गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा व चित्रांगण आर्ट बुक चे प्रकाशन सचिव पुष्कराज पाठक व उपायुक्त माधव जगताप यांचे हस्ते झाले.याप्रसंगी वास्तुविद्येच्या क्षेत्रांमध्ये उल्लेखन्नीय व आदर्श कामगिरी बद्दल पहिला  “भारतीय कला प्रसारिणी सभा वास्तुविद्या जीवन गौरव पुरस्कार” ज्येष्ठ  वास्तुविशारद संजय उमराणीकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी भारतीय कला प्रसारिणी सभा, पुणे चे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक, प्राचार्य डॉ अभिजित नातू (वास्तुकला विद्यालय), प्राचार्य राहुल बळवंत (अभिनव कला महाविद्यालय टिळक रोड), प्राचार्य डॉ संजय भारती (अभिनव कला महाविद्यालय पाषाण), कांतीलाल ठाणगे, अरविंद पाठक (वास्तुविशारद) आदि मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना माधव जगताप म्हणाले, शहरांचे सौदर्यीकरण म्हणजे फक्त कमानी उभारण्याचे काम नाही हे ध्यानात घेऊन काम करण्याची गरज आहे,आपण घरी असो की कार्यालयात ती जागा आपल्याला शांतता देत असते, वास्तूकला ही मनुष्याला सकारात्मकता देणारी कला आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पुष्कराज भालचंद्र पाठक म्हणाले, लोकांच्या स्वप्नातले वास्तु प्रत्यक्षात उतरविण्याचे काम वास्तुविशारद करतात. समाजात अनेक पुरस्कार दिले जातात, मात्र मला असे जाणवले की वास्तुविशारदांना त्यांच्या कामाच्या पलीकडे जाऊन पुरस्कार, सन्मान दिले जात नाहीत, यामुळे हा जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला. उमराणीकरांचे काम भारतीय वास्तुविशारद कलेत महत्वपूर्ण आहे, यामुळेच पाहिला पुरस्कार देण्यासाठी आमच्या नजरेपूढे पहिले नाव त्यांचेच आले. सरांनी निर्माण केलेला आदर्श महत्वाचा आहे

पुरस्काराला उत्तर देताना संजय उमराणीकर म्हणाले, ज्या महाविद्यालयाने घडविले त्यांचा पुरस्कार स्वीकारताना आनंद होतोय, वास्तुविशारद म्हणून काम करताना ग्राहक, बिल्डर यांचे समाधान आणि आपल्या मनाची शांतता  महत्वाची हेच ध्येय ठेऊन कायम वाटचाल केली. पुण्या, मुंबईसह विदेशात सेवा देताना आपल्या कलेचा उपयोग इतरांना व्हावा हाच हेतु कायम होता यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो, १९९९ साली कॅन्सरचे निदान झाल्या नंतरही आजपर्यंत मी कार्यरत आहे, यामागे ग्राहकांचे समाधान, सदिच्छा हेच कारण असल्याची भावना उमराणीकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच त्यांनी एक कलाकृति महाविद्यालयास भेट दिली.  

याप्रसंगी दिवंगत कवयत्री चित्रा भालचंद्र पाठक यांच्या एका देशप्रेमावरील कवितेची फ्रेम भारत – पाकिस्तान सीमेवर मराठा बटालियनाच्या ऑफिसमध्ये लावण्यासाठी ‘आम्ही पुणेकर’ आणि पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट या संस्थेला प्रदान करण्यात आली. 

तसेच कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुभेच्छा संदेश पाठविला होता, त्याचे वाचन पुष्कराज पाठक यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लतिका गवळी यांनी केले, आभार प्राचार्य राहुल बळवंत यांनी मानले.