kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्यायले पाणी!

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी उपोषण सोडल्याची माहिती समोर आली. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी उपोषण थांबवले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकांचा संदर्भ देऊन बाबा लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात असल्याच्या निषेर्धार्थ आबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेष उपोषण सुरू केले होते. बाबा आढाव हे ९४ वर्षाचे आहेत.

राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषणास सुरूवात केली. ‘देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून प्रत्येक निवडणूक पाहत आलो. बराच काळ त्याचा भागही होतो. पण, आता सुरू असलेला भ्रष्टाचार याआधी कधीही पाहिला नाही’, असे बाबा आढाव यांनी उपोषणापूर्वी म्हणाले.

‘निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचारच आहे. मात्र, यावर आयोगाने आक्षेप घेतला नाही, जे अनाकलनीय आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांचे वाटप करण्यात आले. निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत शेकडो कोटींची रक्कम जप्त करण्यात आली, ही देशाच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे’, असेही म्हणाले होते. याशिवाय, लोकसभा आणि विधानसभेच्या निकालात इतका फरक कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मतदानात काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

बाबा आढाव हे पुणे महापालिकेचे १९७० च्या दशकात नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते समाजवादी पक्षाचे सदस्य होते. रिक्षा पंचायतीचे नेते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. एक गाव एक पाणवठा, ही मोहिम त्यांनी सुरु केली होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून आता त्यांची ओळख आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या मतांमध्ये फरक आहे, पण त्यासंदर्भातील कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. हे पहिल्यांदाच घडले आहे, देशात झालेल्या निवडणुकांमुळे लोक खूप अस्वस्थ झाले आहेत, लोकांमध्ये निराशा आहे. दररोज सकाळी ११ वाजता विरोधी पक्षनेते संसदेत प्रश्न उपस्थित करतात. त्यांनी आपले म्हणणे मांडले पण त्यांच्या मागण्या संसदेत मान्य होत नाहीत आणि याचा अर्थ संसदीय लोकशाहीचे योग्य प्रकारे पालन होत नसल्याचा स्पष्ट अर्थ होतो. हे असेच सुरू राहिले तर लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल. त्यासाठी जनतेत जाऊन त्यांना जागरूक करावे लागेल, असे शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.