kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे उपशहर प्रमुखाचे निधन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाण्याचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे यांचं अचानक निधन झालं आहे. ते 47 वर्षांचे होते. विरारच्या सेव्हन सी बीच रिसॉर्ट या ठिकाणी ही घटना घडली. मिलिंद मोरे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांना जमावाने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद मोरे हे त्यांच्या कुटुंबासोबत विरारच्या अर्नाळा, नवापूर या ठिकाणी असलेल्या सेव्हन सी बीच रिसॉर्ट या ठिकाणी गेले होते. त्यावेळी एका रिक्षाचालकाने त्यांच्या पुतण्याला धक्का दिला. यावरुन बाचाबाची झाली. यानंतर रिक्षाचालकाने गावात जाऊन ही बाब गावकऱ्यांना सांगितली. यानंतर रिक्षाचालक आपल्या साथीदारांना घेऊन रिसॉर्ट जवळ आला. त्याने मिलिंद मोरे आणि त्यांच्या पुतण्यावर हल्ला केला.

यावेळी हल्लेखोरांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत वर्मी घाव बसल्याने मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे त्यांना मृत घोषित केले गेले. मिलिंद मोरे कोसळल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.

या घटनेनंतर मिलिंद यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाला की हार्टअटॅकने याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाहीत. पण शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी रिक्षाचालकासह हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिलिंद मोरे यांच्या मृत्यूची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी पोलिसांशी चर्चा केली करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी दिली.

मिलिंद मोरे हे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी ठाण्यातील जवाहर बाग वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.