kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपाकडून विशेष तयारी ; सात दिवस मुंबईच्या भाजपा प्रदेश कार्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन

अयोध्येमध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात हा दिवस उत्साहासारखा साजरा होणार आहे. अशातच, महाराष्ट्रातील श्रीरामभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अयोध्येतील राम मंदिरातील जयघोष राज्यभरात दुमदुमणार आहे. यासाठी महाराष्ट्र भाजपाकडून विशेष तयारी करण्यात येत आहे. राज्यात सुद्धा हा सोहळा साजरा करण्याचे भाजपाकडून नियोजन करण्यात आले आहे. सात दिवस मुंबईच्या भाजपा प्रदेश कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. १५ जानेवारी ते २२ जानेवारी या दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे.

रामलललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा उत्सव हा राज्यभरात साजरा केला जाणार आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे उद्धाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या उद्धाटन सोहळ्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांची उपस्थिती राहाणार आहे.

याचबरोबर, राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर रामाची मोठी फ्रेम, राम मंदिराची प्रतिकृती आणि रोषणाई करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला अनुप जलोटा, अभिनेत्री दीपिका चिखलिया, अरुण गोविल यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रातही रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली आहे. यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारीही तयारीला लागले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

  • १५ जानेवारीला या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे.
  • १६ जानेवारीला सोमा घोष यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.
  • १७ जानेवारीला संध्याकाळीअलका झा, सुरेश आनंद आणि घनश्याम जी यांचा भजनाचा कार्यक्रम असेल.
  • १८ जानेवारीला अनुप जलोटा यांचे भजन आणि संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.
  • २० जानेवारीला कार्यक्रमात रामायण मालिकेतील अभिनेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
  • २१ जानेवारीला कवी मनोज शुक्ला यांचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.
  • २२ जानेवारीला पद्मश्री सुरेश वाडकर यांचे देखील कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण भाजपच्या सोशल मीडियावरून केले जाणार आहे.