भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळयान मोहीम आजही अपयशी ठरली आहे. अवकाशात झेपावणार त्याआधीच त्यांचं यानात तांत्रिक बिघाड झाल्याने मोहिमेच्या तीन मिनिटांआधी ही मोहिम रद्द करावी लागली आहे. या महिन्यातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान, सुनिता विल्यम्स आणि त्यांचे बुच विल्मोर हे सुरक्षित आहेत.

बोईंग स्टारलाईनर प्रक्षेपणाच्या अवघ्या ३.५१ सेकंदापूर्वी बंद पडले. अवकाश यानात झेप घेण्यासाठी सुनिता विल्यम आणि बुच विल्मोर नवीन बोईंग स्टारलाईन या अंतराळ यानात बसले होते. शनिवारी रात्री १० वाजता अमेरिकेच्या फ्लोरिडा येथून अॅटलस व्ही रॅकेटचा वापर करून ते अंतराळयानातून गगनझेप घेणार होते. परंतु, प्रक्षेपणाच्या काही मिनिटे आधीच तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहिमही आता पुढे ढकलण्यात आली आहे.

७ मे रोजीही ही नियोजित मोहीम अपयशी ठरली होती. आता या मोहिमेच्या नव्या प्रक्षेपणासाठी जवळपास २४ तास लागतील. परंतु, नव्या मोहिमेची वेळ अद्याप जाहीर केलेली नाही. ग्राउंड लॉन्च सिक्वेन्सर आणि रॉकेटवर लक्ष ठेवणाऱ्या संगणकाद्वारे तांत्रिक त्रुटी आढळून आली. अंतराळवीर आता स्टारलाइनर कॅप्सूलमधून बाहेर पडतील आणि केनेडी स्पेस सेंटरमधील क्रू क्वार्टरमध्ये परत येतील.

स्टारलाइनर अंतराळयानावर सुनीता प्रशिक्षण घेत होत्या. यानाच्या विकासातील अडथळ्यांमुळे मोहीम प्रलंबित होती. जुलै २०२२मध्ये स्टारलाइनर या नव्या यानातून अंतराळवीर अवकाशात जाणार होते, मात्र करोनामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. २००६ आणि २०१२ मध्ये त्यांनी अंतराळात प्रवास केला होता. या दोनही मोहिमांमध्ये एकूण ३२२ दिवस त्यांनी अंतराळात घालवले होते. हा विक्रम मानला जात आहे. त्यामुळे यावेळेस त्या तिसऱ्यांदा अंतराळात जाणार होत्या.