राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त श्री दिलीप सरदेसाई यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार – मुंबई शहराचे अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी भेट घेऊन सीईटी (PCM गट) परीक्षेतील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेमधील तांत्रिक चुकांविषयी सविस्तर चर्चा केली.
या वर्षीच्या सीईटी परीक्षेमध्ये (PCM – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) जवळपास २० ते २२ प्रश्नांमध्ये गंभीर तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. ही परीक्षा सुमारे ४.५ ते ५ लाख विद्यार्थ्यांनी दिली असून, इतक्या मोठ्या प्रमाणात चुका होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
ॲड. अमोल मातेले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, विद्यार्थ्यांनी दोन वर्षांहून अधिक काळ कठोर परिश्रम घेतले असून अशा चुका त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या आहेत. विद्यार्थ्यांना कोणतीही चूक नसताना त्यांना मानसिक तणाव व अन्याय सहन करावा लागत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
या संदर्भात त्यांनी पुढील ठाम मागण्या आयुक्तांसमोर मांडल्या चुकीच्या प्रश्नांचे पुनर्मूल्यांकन करून सर्व संबंधित प्रश्नांचे पूर्ण गुण विद्यार्थ्यांना द्यावेत.विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नुकसान होणार नाही, याची लिखित हमी द्यावी.
सीईटी कक्षाचे आयुक्त श्री दिलीप सरदेसाई यांनी सांगितले की, २७ एप्रिल रोजी झालेल्या पीसीएम गटाच्या परीक्षेतही इंग्रजी प्रश्नपत्रिकेत चुका आढळून आल्या आहेत. त्यात सहभागी २४,७०० विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे. पेपर तयार करणाऱ्या सहा-सात जणांच्या टीमवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना सरसकट गुण देता येणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
यासंदर्भात ५ मे रोजी या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम्ही नेहमीच सजग राहणार आहोत, असा संदेश ॲड. अमोल मातेले यांनी दिला.
Leave a Reply