पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याचा शोध घेऊन त्यांना योग्य उत्तर दिले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी दहशतवादाविरोधात सरकारचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार कोणत्याही दहशतवाद्याला सोडणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
आसामच्या बोडो समुदायाचे नेते उपेंद्र नाथ ब्रह्मा यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शहा म्हणाले, १९९० च्या दशकापासून काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणाऱ्यांविरोधात पंतप्रधान मोदींनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. सरकार त्यांच्याविरुद्ध जोरदार लढा देत आहे. देशातून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा संकल्प आहे आणि तो पूर्ण होईल. जर दहशतवाद्यांना वाटत असेल की भ्याड हल्ला करून त्यांनी मोठा विजय मिळवला आहे, तर त्यांनी लक्षात ठेवावे की, हे मोदी सरकार आहे. कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दहशतवाद्यांना दिला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करत अमित शाह म्हणाले, हे केवळ त्यांच्या कुटुंबियांचे दुःख नाही, तर संपूर्ण देशाचे दुःख आहे. देशाच्या कोणत्याही भागात दहशतवाद टिकू दिला जाणार नाही आणि तो मुळापासून नष्ट केला जाईल. भारतातील १४० कोटी जनता दहशतवादाविरोधात सरकारसोबत आहे. जगभरातून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा आहे, असेही शहा यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply