बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगित अत्याचारप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविरोधात मंगळवारी बदलापूरकरांचा आक्रोश पहायला मिळाला. असंख्य लोक रस्त्यावर उतरले होते. तर रेल्वे रुळांवर ठिय्या आंदोलन करत त्यांनी काही तास रेल्वेसेवा बंद पाडली होती. कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असतानाच माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आंदोलकांनी तब्बल 10 तास कल्याण-कर्जत रेल्वे मार्ग रोखून धरला. बदलापूरमधल्या या घटनेबाबत सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेता रितेश देशमुखनेही एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ट्विट करत या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
‘एक पालक म्हणून मी पूर्णपणे दुखावलोय, वैतागलोय आणि चिडलोय. दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केलं. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वत:च्या घराइतकीच सुरक्षित जागा असायला हवी. या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना जी शिक्षा दिली, चौरंग – हेच कायदे आपल्याला पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे.’ अशा शब्दांत रितेश देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे.
आदर्श शाळेत गेल्या आठवड्यात दोन चार वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं होतं. पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणी केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तास लावले आणि शाळा प्रशासनानेही घटनेकडे दुर्लक्ष केल्याने शहरात संतापाची लाट पसरली. शहरातील काही राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर बंदची हाक देत आंदोलनाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत सकाळी सहा वाजल्यापासून शाळेबाहेर पालकांनी निदर्शनं केली.
आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करत साडेअकराच्या सुमारास आक्रमक आंदोलकांनी शाळेत प्रवेश केला आणि तिथे तोडफोड केली. त्याचवेळी काही आंदोलक रेल्वे स्थानकाकडे गेले आणि त्यांनी रेल्वे रुळांवर ठिय्या मांडला. बदलापूर रेल्वे सेवा संपूर्ण ठप्प झाली होती. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींनी विनवणी करूनही आंदोलक हटले नाहीत.