Breaking News

महाराष्ट्राचा 58व्या निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ पुण्याच्या धरतीवर होणार संत समागम

महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये दिनांक 24, 25 व 26 जानेवारी, 2025 रोजी मिलीटरी डेअरी फार्म ग्राउंड, पिंपरी पॉवर हाउस जवळ, शास्त्री नगर, पुणे 411017 (महाराष्ट्र) येथील विशाल मैदानांवर आयोजित केला जात आहे. परमात्म्याची ओळख करुन मानवी जीवन दिव्य गुणांनी युक्त करत अनंताकडे विस्तारित करुन विश्वामध्ये सौहार्द व शांतीसुखाचे वातावरण निर्माण करणे हा या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे.

​या भव्यदिव्य आध्यात्मिक आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी स्वेच्छा सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मंडळाच्या प्रचार-प्रसार विभागाचे मेंबर इंचार्ज आदरणीय श्री.मोहन छाब्राजी यांच्या शुभहस्ते बुधवार, दि. 25 डिसेंबर, 2024 रोजी करण्यात आला. या प्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इंचार्ज श्री.जोगिंदर मनचंदा, प्रचार प्रसार कॉर्डिनेटर (महाराष्ट्र) डॉ.दर्शन सिंह, समागम समितीचे चेअरमन श्री.शम्भुनाथ तिवारी, समन्वयक श्री.ताराचंद करमचंदानी आणि समागम समितिच्या अन्य सदस्यांसहित समस्त महाराष्ट्रातील सेवादल क्षेत्रीय संचालक उपस्थित होते. हजारो सेवादल स्वयंसेवकांसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविक भक्तगणांनी या समारोहामध्ये भाग घेतला.

स्वेच्छा सेवांच्या उद्घाटन प्रसंगी आपले भाव व्यक्त करताना आदरणीय श्री.मोहन छाब्राजी म्हणाले, की सतगुरुंच्या असीम कृपेने आयोजित होत असलेल्या या संत समागमामध्ये तोच सत्याचा संदेश दिला जाईल जो युगानुयुगे संत-महापुरुषांनी समस्त मानवतेला दिला.
ते पुढे म्हणाले, की संत निरंकारी मिशन मानवता व विश्वबंधुत्वाचे मिशन आहे. परमात्म्याचे ज्ञान प्राप्त केल्याने मानवा-मानवातील अंतर संपून जाते आणि एकमेकांशी प्रेमाचे नाते जोडले जाते. ज्यायोगे वैर, द्वेष, ईर्षा यांसारख्या दुर्भावना दूर होतात. ब्रह्मानुभूतिने आत्मानुभूति प्राप्त करुन मानवी गुणांनी युक्त होऊन धरतीसाठी वरदान बनेल असे जीवन जगणे हे मनुष्य जीवनाचे मुख्य लक्ष्य आहे.

​उल्लेखनीय आहे, की महाराष्ट्रात वार्षिक निरंकारी संत समागमांची परंपरा फार जुनी आहे. 1968 मध्ये महाराष्ट्राचा पहिला संत समागम मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला व त्यानंतर सतत 52 संत समागम मुंबई महानगरातच होत आले. सन 2020मध्ये 53वा संत समागम नाशिक मध्ये झाला, 56वा संत समागम छत्रपती संभाजी नगर येथे तर 57वा संत समागम नागपुर नगरी येथे आयोजित करण्यात आला. यावर्षी हा 58वा संत समागम आयोजित करण्याचे सौभाग्य वि़द्येचे माहेरघर पुणे नगरीला प्राप्त झाले आहे, ज्याचे साक्षी अवघे विश्व होईल.

​समालखा येथे आयोजित 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्येक भक्त महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

​हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या तन्मयतेने समागम स्थळावर पूर्वतयारीसाठी आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *